तालुक्यातील पाणजे हे अरबी समुद्राच्या किनाऱ्यावरील गाव असून वाढलेल्या झाडा झुडपामुळे या गावात जाणाऱ्या मार्गाचे रूपांतर जंगलाच्या रस्त्यात झाले आहे. त्यामुळे पाणजे गावाचा रस्ता आहे की जंगलाचा असा सवाल ग्रामस्थांकडून केला जात आहे.सिडकोच्या माध्यमातून उरण तालुक्यातील काही गावांचा विकास केला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून सिडकोच्या द्रोणागिरी नोड मधील सेक्टर १९ च्या पाणजे गावात जाण्यासाठी ये जा करण्यासाठी सिडकोने उरण पनवेल महामार्ग ते पाणजे गाव असा चार किलोमीटर चा दोन पदरी रस्ता तयार केला आहे. या मार्गावरील पदपथ व दुभाजकावर पावसामुळे मोठ्या प्रमाणात झाडे झुडपे उगवली आहेत. त्यांची वाढ झाल्याने ही झुडपे रस्त्यात आली आहेत.
हेही वाचा >>> स्वच्छता सर्वेक्षणात पनवेल पालिकेचा राज्यात ५ वा तर देशात १७ वा क्रमांक
त्यामुळे रस्त्याच्या पलीकडील वाहन किंवा व्यक्ती दृष्टीस पडत नाही. त्याचप्रमाणे या वाढलेल्या झुडपामुळे सरपटणारे प्राणी ही या मार्गावर वावरत असल्याने रस्त्यावरून दिवसा आणि रात्रीच्या वेळी पायी प्रवास करणाऱ्या प्रवाशी व ग्रामस्थांना याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे मार्गावरील देखभाल दुरुस्तीची जबाबदारी सिडकोची असल्याने रस्त्यावरील झाडे झुडपे त्वरित हटविण्याची मागणी पाणजे ग्रामस्थांनी केली आहे.