उरण : दरवर्षी दूरवर असलेल्या प्रियजनांना एकत्र आणून नात्यांची वीण घट्ट करणाऱ्या गाव यात्रांना शुक्रवारी सुरुवात झाली. चैत्र महिन्यात दरवर्षी गावातील गाव देव-देवीच्या जत्रा आणि यात्रांना सुरुवात होते. याची तयारी उरण तालुक्यातील विविध गावांत सुरू झाली आहे.
उरणमधील जसखार येथील रत्नेश्वरी, करंजा येथील द्रोणागिरी, डोंगरी येथील अंबादेवी, नवीन शेवा येथील शांतेश्वरी आदी देवींच्या यात्रा या प्रसिद्ध आहेत.

या यात्रांमध्ये सहभागी होण्यासाठी गावाबाहेर नोकरी व्यवसायासाठी गेलेले ग्रामस्थ मोठ्या उत्साहाने हजेरी लावतात. या यात्रांमध्ये गावातील हौशी कलाकार नाटक सादर करतात. यावेळी शासन काठी नाचविण्याचीही प्रथा अनेक गावांत आहे. त्यासाठी ग्रामस्थ महिनाभर मेहनत घेतात. या यात्रांमध्ये मांसाहारी मेजवानी असते. तसेच दोन दोन दिवस चालणारे पालखी उत्सवही असतात. आजच्या आधुनिक काळातही उरणमध्ये शेकडो वर्षांची जत्रा आणि यात्रांची परंपरा कायम आहे.

फुंडे गावची घुरबा देवीची यात्रा ३ एप्रिल रोजी साजरी करण्यात आली. समुद्र किनाऱ्यावर वसलेल्या न्हावा गावाच्या डोंगरातील गावदेवीची यात्रा सुरू आहे. दोन ते तीन दिवस रंगणाऱ्या या यात्रेत पालखी सोहळा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी उसळते. पालखी मिरवणूक गावभर फिरवण्यात येते. भाविकांच्या उत्साहामुळे देवीची पालखी माघारी मंदिरात येण्यासाठी कधी-कधी ३६ ते ४८ तासांहूनही अधिक कालावधी लागतो.

द्रोणगिरी डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या द्रोणगिरी देवीची यात्रा ९ व १० एप्रिल रोजी पार पडणार आहे. देवीदेवतांनी सजवलेल्या चित्ररथातुन देवीची पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे. तर जसखार ग्रामस्थांची प्रसिद्ध ग्रामदेवता श्री रत्नेश्वरी देवीचा पालखी सोहळा १०, ११, १२ एप्रिल असा सलग तीन दिवस साजरा करण्यात येणार आहे. त्यानंतर गव्हाण गावच्या शांतादेवी आणि नवीन शेवा येथील शांतेश्वरी देवीची यात्रा -पालखी सोहळा ११ व १२ एप्रिल साजरा केला जाणार आहे. जसखार येथील रत्नेश्वरी देवीची यात्रा ही मुंबई, ठाणे व रायगड जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. त्यामुळे या यात्रेला भाविकांची प्रचंड गर्दी जमते. दरवर्षी अगदी उत्साहात ही यात्रा भरविण्यात येते, अशी माहिती जसखार येथील सामाजिक कार्यकर्ते दीपक ठाकूर यांनी दिली.

देव काठ्या नाचविण्याची प्रथा

चैत्र अमावस्येला कोप्रोली गावची ग्रामदेवता जोगेश्वरी माता व बापुजी यात्रा उत्सव पार पडणार आहे. या यात्रेत उंचच उंच देव काठ्या नाचविण्याची प्रथा आहे. यात्रेतील भाविकांकडून देव काठ्या नाचविण्याचा सोहळा पाहण्यासाठी पंचक्रोशीतील भाविकांची यात्रेला मोठी गर्दी उसळते. हा सोहळा १७ एप्रिल रोजी पार पडणार आहे.