उरण : पाऊस लांबल्याने संपूर्ण तालुक्याला पाणीपुरवठा करणाऱ्या रानसई आणि पुनाडे या दोन्ही धरणांनी आता तळ गाठला आहे. त्यामुळे उरणकारांना पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. दरम्यान पाणीटंचाईच्या समस्येमुळे पुन्हा एकदा उरणच्या पाणीसाठ्यात वाढीची गरज भासू लागली आहे. रानसई धरणाच्या उंची वाढविण्यासाठी व पुनाडे धरणाची गळती थांबवून या धरणांची साठवण क्षमता वाढीण्याची मागणी आता नागरिक करत आहेत.
सध्या उरण तालुक्यातील सहा आदिवासी वाड्या, चाणजे, केगाव व पुनाडे तसेच धरणावर अवलंबून असलेल्या आठ गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाला आदिवासी वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे.
उरण तालुक्यातील केगाव, चाणजे या दोन ग्रामपंचायत हद्दीतील गावांना पाणीटंचाईने सर्वाधिक ग्रासले आहे. १२ ते १५ दिवसांनी पाणी मिळत असल्याने नागरिकांना पाण्यासाठी बोअरवेल, विहिरींचा आधार घ्यावा लागत आहे. मात्र त्यांनीही आता तळ गाठल्याने पाणी विकत घ्यावे लागत आहे. तालुक्यातील अनेक जलजीवन योजनांची कामे अपूर्ण असल्याने पाणीटंचाई अधिकच तीव्र झाली आहे. त्यातच साठवणूक करण्यात आलेले पाणीदुषीत होत असल्याने नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे.
नादुरुस्त पंप
जलजीवन योजना मागील चार वर्षांपासून रखडलेली आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या दोन विद्युत पंपापैकी एक पंप बंद असल्याने पाणीपुरवठ्यामध्ये आणखीनच भर पडली. पंप दुरुस्तीसाठी जीवन प्राधिकरण विभागाला सांगितले आहे. मात्र तोपर्यंत नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे, अशी माहिती पुनाडे आठ गाव पाणीपुरवठा कमिटीचे अध्यक्ष आणि रायगड जिल्हा परिषद सदस्य ॲड. अविनाश ठाकूर यांनी दिली.
सिडकोकडून पाणी
दोन लाख लोकसंख्या असलेल्या उरण शहर, औद्योगिक परिसर व ग्रामीण भागातील २५ ग्रामपंचायतींना दररोज ४० एमएलडी पाण्याची आवश्यकता आहे. मात्र ११६ फूट उंच पातळीच्या रानसई धरणाची पाणीपातळी ८६.०६ फुट खाली घसरली आहे. यामुळे धरणात दहा दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा आहे. त्यामुळे रानसई धरणाच्या मृत साठ्यातून पाणी पुरवठा सुरू करण्यात येत आहे. तसेच दररोज ४.५ एमएलडी सिडकोकडून घेऊन नागरिकांना पाणीपुरवठा केला जात आहे. याआधीच आठवड्यातील दोन दिवस पाणी कपात केली आहे. आता नागरिकांना कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे, अशी माहिती उरण एमआयडीसीचे उपअभियंता तानाजी कांबळे यांनी दिली.
उरण तालुक्यातील रानसई, केळ्याचा माळ, चांदायली वाडी, खैरकाठी, बंगल्याची वाडी, सागाचीवाडी, मार्गाची वाडी अशा आदिवासी वाड्यांना पाणीटंचाईने ग्रासले आहे. यापैकी दोन वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. – महेश म्हात्रे, सभापती, उरण पंचायत समिती
