उरण : औद्योगिक तालुका म्हणून उरणची देशात ओळख आहे. मात्र येथील रायगड जिल्हा परिषदेच्या मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये परप्रांतीय विद्यार्थ्यांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. स्थानिक पालकांचा इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे असलेला ओढा, कामानिमित्त आलेल्या परप्रांतीयांची वाढलेली संख्या हे याचे मूळ कारण असल्याचे जाणकारांचे मत आहे.
उरण तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या एकूण ५६ शाळांमध्ये ४ हजार ३०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. उरणमधील एका १ ली ते ७ वीपर्यंत वर्ग असलेल्या शाळेत ९७ विद्यार्थ्यांपैकी केवळ ३ मुले स्थानिक गावातील आहेत. जिल्ह्याबाहेरील मुलांची संख्या २५ तर परराज्य आणि अ मराठी विद्यार्थ्यांची संख्या ६९ आहे. ही स्थिती उरणच्या औद्योगिक पट्टा असलेल्या पश्चिम विभागातील बहुतांशी शाळांत आहे. तर पूर्व विभागात गावातील शाळांत विद्यार्थी संख्या अधिक असली तरी ही संख्या ही पुढील काळात घटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
उरणच्या जेएनपीए बंदरात कंटेनर यार्ड आणि गोदामांमध्ये काम करणाऱ्या परप्रांतीयांचे प्रमाण अधिक आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये त्यांच्या मुलांना मोफत शिक्षण मिळत असल्याने मातृभाषा हिंदी असली तरी ती मुले याच शाळेत प्रवेश घेतात. दरम्यान या मुलांना शिकविण्यासाठी येथील शिक्षकांना विशेष कौशल्य वापरावे लागते, अशी माहिती शिक्षकांनी दिली. यात प्रामुख्याने उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान या राज्यांतील विद्यार्थी आहेत. विशेष म्हणजे या मुलांना मराठी उत्तम बोलता येते, त्याचप्रमाणे त्यांना मराठी विषयात ८० टक्के गुणही मिळत आहेत.
उरणच्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये २०२५-२६ या वर्षात ४ हजार ४६५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. तर २०२६-२७ या वर्षात ही संख्या ४ हजार ३०० आहे. या संख्येत ऑगस्टपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण उत्तर भारतातील विद्यार्थी हे उशिराने प्रवेश घेतात, अशी माहिती नाव न छापण्याच्या अटीवर शिक्षकांनी दिली.
जिल्हा परिषदेच्या शाळांत बहुभाषिक विद्यार्थी आहेत. आमच्यासाठी विद्यार्थी हे विद्यार्थी आहेत. त्यांच्यात भेद करता येत नाही. – सागर पवार, गट शिक्षणाधिकारी, उरण पंचायत समिती
