नवी मुंबई -ऐरोली सेक्टर-४ मधील दिवंगत काळू राघो सोनवणे हरितपट्टा ज्येष्ठांसाठी धोकादायक ठरत होता. दिवंगत काळू राघो सोनवणे हरितपट्टा व या ठिकाणच्या उद्यानातील मुख्य लोखंडी प्रवेशद्वार व त्याच्या उंचीमुळे ज्येष्ठ नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत होता. कारण या लोखंडी प्रवेशद्वारामुळे अनेक ज्येष्ठ नागरिकांना दुखापती होऊन रुग्णालय गाठावे लागले होते.
त्यामुळे नवी मुंबई महापालिकेने बनवलेल्या या हरितकट्ट्याकडे काळजीपूर्वक लक्ष देऊन मुख्य प्रवेशद्वाराची उंची कमी करण्याची मागणी शहरातील ज्येष्ठ नागरिकांनी पालिकेकडे केली होती. याबाबत ‘लोकसत्ता’ने वृत्त प्रसिद्ध करताच पालिकेने तात्काळ या ठिकाणी दुरुस्ती करीत मुख्य प्रवेशद्वाराची उंची कमी केली आहे. त्याबद्दल ऐरोलीतील ज्येष्ठ नागरिक संघानेही पालिकेचे आभार मानले आहेत.




ऐरोली सेक्टर-४ मधील हरितपट्ट्याविषयी ज्येष्ठ नागरिकांची तक्रार आली होती. आता उद्यानाच्या मुख्य प्रवेशद्वाराची उंची कमी करण्यात आली असून अभियंता विभागाकडून इतर कामे करून घेण्यात येत आहेत. त्यामुळे लवकरात लवकर अभियंता विभागामार्फत कार्यवाही करण्याचे सूचित करण्यात आले आहे.