नवी मुंबई : शहरात लस उपलब्ध होत नसल्याने लसीकरण ठप्प झाले आहे. रविवारनंतर नवी मुंबई पालिकेला लस न मिळाल्याने लसीकरण केंद्र बंद ठेवण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. लस मिळत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.

बुधवारीही लस न मिळाल्याने गुरुवारीही लसीकरण बंदच राहणार आहे. फक्त कोव्हॅॅक्सिनची दुसरी मात्रा देण्यात येणार आहे. खासगी रुग्णालयात ८५० रुपयांत काही ठिकाणी लस मिळत आहे. मागील काही दिवसांपासून ठाणे जिल्ह्य़ासाठी येणाऱ्या लस कुप्या अल्पप्रमाणात मिळत असल्याने पालिकेची अडचण निर्माण झाली आहे. त्यातच १८ वर्षांवरील लसीकरणही सुरू करण्यात आले आहे.

मात्र मागील काही दिवसांपासून लस उपलब्ध नसल्याने पालिकेच्या केंद्रांवर लस मिळत नाही. अपोलो रुग्णालय वगळता इतर खासगी रुग्णालयातही लस तुटवडा सुरू आहे. डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात त्यांच्या कर्मचाऱ्यांना स्पुटनिक लस दिली जात आहे. त्यामुळे लस कधी मिळणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.

रविवारी लस प्राप्त झाली त्यानुसार लसीकरण झाले. परंतु त्यानंतर लसच मिळाली दुसऱ्या मात्रेचे लसीकरण होत नाही. तर कोव्हॅक्सिनच्या दुसऱ्या मात्रेचे लसीकरण ठरावीक केंद्रावर होईल.

 – डॉ. रत्नप्रभा चव्हाण, लसीकरण प्रमुख

अनेक दिवसांपासून लस घ्यायची तयारी केली आहे, परंतु वारंवार पालिकेकडे विचारणा केली असता लस उपलब्ध नाही असे सांगितले जाते आहे. तिसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावापासून वाचण्यासाठी लस हवी आहे पण लसच मिळत नाही.

 – रोहिणी निपाणे, नागरिक