नवी मुंबई : नवी मुंबई शहरात चौथ्या लाटेतही करोनास्थिती नियंत्रणात ठेवण्यात महापालिकेला यश आले असताना दुसरीकडे उर्वरित मुंलांचे व नागरिकांचे १०० टक्के लसीकरण पूर्ण करण्यासाठी पालिका प्रयत्नशील आहे. मुलांच्या शंभर टक्के लसीकरणासाठी शाळांमध्ये लसीकरणाचे नियोजन करण्यात आले असून सोमवारपासून् याची सुरुवात करण्यात आली आहे. महिनाभरात २२५ शाळांमध्ये लसीकरणाची सुविधा करून देण्यात येणार आहे.

लसीकरणाच्या प्रत्येक टप्प्यावर पालिकेने योग्य नियोजन करीत लसीकरणाकडे विशेष लक्ष दिले आहे. १८ वर्षांवरील नागरिकांना दोन्ही लसमात्रा देण्यात आल्या आहेत. आता लहान मुले व उर्वरित लसीकरणावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

पुन्हा एकदा नवीन वर्षांला सुरुवात झाली असून  लसीकरणाच्या १०० टक्के उद्दिष्टपूर्तीसाठी पालिकेने ३० जुलैपर्यंत शालेय विद्यार्थ्यांकरिता विशेष लसीकरण मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे. १ जुलै ते ३० जुलै या कालावधीत नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील २२५ शाळांमध्ये लसीकरणासाठी वेळापत्रक तयार करम्ण्यात आले आहे. या महिनाभरात २९,६४६ मुलांना लसीकरण करम्ण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.  सोमवारी पहिल्या दिवशी न्यू होरायझन पब्लिक स्कूल, सेक्टर १९ या शाळेपासून या विशेष लसीकरण मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. १२ ते १४ वयोगटातील मुलांना कोर्बिव्हॅक्स लशीचा पहिला व दुसरा डोस देण्यात येणार असून १५ ते १८ वयोगटातील मुलांनाही पहिला व दुसरा डोस देण्यात येणार आहे.

नवी मुंबई शहरात पालिका आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली सुरुवातीपासूनच नियोजनबध्दरीत्या लसीकरणाचे नियोजन केल्यामुळे शहरात आलेल्या करोनाच्या लाटेवर पालिकेला तात्काळ नियंत्रण मिळवता आले आहे. मुलांच्या लसीकरणासाठी पालिकेने २२५ शाळांमध्ये लसीकरणाचे नियोजन केले असून लसपात्र नागरिक व मुलांचे १०० टक्के लसीकरण पूर्ण करण्याचे पालिकेचे लक्ष्य आहे.

डॉ.रत्नप्रभा चव्हाण, लसीकरणप्रमुख, नवी मुंबई महापालिका