नवी मुंबई : दीड वर्षांपासून बंद असलेली महाविद्यालये बुधवारपासून सुरू झाली आहेत. मात्र दोन्ही मात्रा घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच प्रवेश दिला जात आहे. त्यामुळे विद्यार्थीसंख्या कमी आहे. यासाठी नवी मुंबई महापालिका प्रशासनाने पुढाकार घेतला असून थेट महाविद्यालयांत लसीकरणाची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. शहरातील दहा महाविद्यालयांत शुक्रवारपासून लसीकरण आयोजित करण्यात येणार आहे.

नवी मुंबई करोना लसीकरणात मुंबई महानगर प्राधिकरण क्षेत्रात आघाडीवर आहे. लसपात्र नागरिकांपैकी सर्वाना पहिल्या मात्रेचे लसीकरण पूर्ण झाले असून आता दुसऱ्या मात्रेच्या लसीकरणावर भर दिला आहे.

बुधवारपासून शहरांतील महाविद्यालये सुरू करण्यात आली आहेत. मात्र दोन्ही लसमात्रा घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच महाविद्यालयात प्रवेश मिळत आहे. त्यामुळे विद्यार्थीसंख्या कमी असल्याने त्यांचे प्राधान्याने लसीकरण करणे गरजेचे आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. 

पालिका शाळांमध्ये असलेल्या लसीकरण केंद्रावर प्रतिसाद आता कमी मिळत आहे. तेथील केंद्रे बंद करून  लसीकरणासाठीचे हे मनुष्यबळ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना लसीकरण करण्यासाठी पुरविण्यात येणार आहे.

यापूर्वीही महापालिका प्रशासनाने विविध घटकांसाठी विशेष लसीकरण मोहिमा हाती घेतल्या होत्या. त्यानुसार आता महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी लसीकरण मोहीम हाती घेतली आहे.

महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना लसीकरण करण्यासाठी विद्यालयातच जाऊन लसीकरण करण्यात येणार आहे. शक्रवारी १० महाविद्यालयांत लसीकरण करण्याचे नियोजन असल्याचे पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले.

दहा केंद्रे

* एस. के. कॉलेज, सेक्टर २५

* आयसीएल कॉलेज, वाशी

* वाय. सी. कॉलेज, कोपरखैरणे

* टिळक कॉलेज, वाशी

* स्टर्लिग कॉलेज, नेरुळ

* तेरणा इंजिनीअरिंग कॉलेज, नेरुळ

* मॉडर्न कॉलेज, वाशी

* शेतकरी शिक्षण संस्था विद्यालय, घणसोली गाव

* भारती विद्यापीठ, बेलापूर

* इंडियन एरोस्पेस आणि इंजिनीयरिंग कॉलेज, तुर्भे

३१ हजार लसमात्रांचे नियोजन

नवी मुंबई महापालिकेला गुरुवारी ३०,००० कोव्हिशिल्ड व १८०० कोव्हॅॅक्सिन लस मिळाली आहे. त्यानुसार पालिका प्रशासनाने लसीकरणाचे नियोजन केले आहे. पालिकेला मोफत लसीकरणासाठी आतापर्यंत १०,००,३३० लसमात्रा मिळाल्या आहेत.