लस घेण्यास टाळाटाळ सुरूच; १३ हजार लसमात्रा शिल्लक

नवी मुंबई : करोनाच्या नव्या ओमायक्रॉन विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा निर्बंध लागू करण्यात येत असून यात लसवंतांनाच प्रवेश व प्रवास याला प्राधान्य देण्यात येत आहे. मात्र नवी मुंबईत अद्याप दोन्ही लसमात्रा न घेतलेल्यांची संख्या ही सव्वा दोन लाखांपर्यंत आहेत.

पालिका प्रशासनाकडे लस  शिल्लक आहे, मात्र दुसरी मात्रा घेण्यास टाळाटाळ सुरू आहे. मात्र नव्या ओमायक्रॉन विषाणूमुळे नागरिक लस संरक्षित होणे गरजेचे आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने पहिली लसमात्रा घेऊन ८४ व २८ दिवस होताच तत्काळ दुसरी लसमात्रा घेण्याचे आवाहन केले आहे.

नवी मुंबईत करोना लसीकरण सुरू झाल्यापासून आतापर्यंत २० लाख ७८ हजार ९७४ लसमात्रा देण्यात आल्या आहेत. यात पहिली लसमात्रा १२ लाख ०५ हजार ८०६ जणांनी, तर दोन्ही लसमात्रा ८ लाख ७३ हजार ६८ जणांनीच घेतली आहे. शहरातील एकूण लोकसंख्येच्या तुलनेत १८ वर्षांवरील लसलाभार्थींची संख्या ११ लाख ८० हजार इतकी गृहीत धरण्यात आली होती. मात्र आतापर्यंत १२ लाख ०५ हजार ८०६ जणांनी पहिली लसमात्रा घेतली आहे. लसलाभार्थींची धरलेली लाभार्थी संख्या जरी गृहीत धरली तरी दुसरी लसमात्रा न घेतलेल्यांची संख्या सुमारे २.२५ लाख इतकी आहे. 

नागरिकांनी आपली करोना लशीची पहिला मात्रा घेऊन विहित कालावधी पूर्ण झाल्यावर  दुसऱ्या लसमात्रेसाठी नजीकच्या लसीकरण केंद्रावर जाऊन दुसरी मात्रा घ्यावी. पालिकेकडे ७० हजांराहून अधिक लसमात्रा शिल्लक आहेत.

डॉ. रत्नप्रभा चव्हाण, लसीकरण प्रमुख