नवी मुंबई : महाराष्ट्रात विशेषत: मुंबई महानगर प्रदेशात मराठी-अमराठीच्या मुद्द्यावर राजकीय ध्रुवीकरणाचे अनेक प्रसंग गेल्या काही काळापासून चर्चेत ले आहेत. येत्या १४ सप्टेंबर रोजी गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत वाशीमध्ये ‘हिंदी दिवसा’चे अैाचित्य साधत देशभरातील हिंदी साहित्यिक, संस्था आणि सदस्यांचे अखिल भारतीय राजभाषा संमेलनाचे आयोजन केले आहे.
येथील पोलीस तसेच प्रशासकीय यंत्रणा आतापासूनच सतर्क झाल्या आहेत. उत्सव काळात मुंबईवरील कायदा-सुव्यवस्था राखण्याचा ताण, दुसर्या दिवशी दीड दिवसांच्या गणपतींचे विसर्जन, याच काळात महानगर प्रदेशातील मोठी प्रशासकीय यंत्रणा हिंदी भाषणांच्या सुव्यवस्थेसाठी वाशी तसेच आसपासच्या प्रदेशात तैनात करावी लागणार आहे. तशा स्वरूपाचे नियोजनही सुरू आहे.
मराठी भाषा आणि सार्वजनिक जीवनातील तिचा वापर या मुद्द्यावरून गेल्या काही दिवसांपासून राज्यात तसेच मुंबई महानगर प्रदेशात ताणतणावाचे प्रसंग निर्माण होताना दिसले. विशेषत: रिक्षा, टॅक्सीचालकांसाठी मराठीसक्तीच्या मुद्द्यावरून सत्तेत असलेल्या महायुतीमधील एकनाथ शिंदे यांचा शिवसेना पक्ष आग्रही दिसला. मात्र, अमराठी चालकांनी त्यास विरोध केला. मराठी-अमराठी मुद्द्यावरून वादाचे प्रसंग घडत असतानाच गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी केंद्र सरकारमार्फत हिंदी दिवसाचे मोठे संमेलन मुंबईच्या वेशीवर वाशीत आयोजित केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
देशभरातील हिंदी मंडळे, सदस्यांची उपस्थिती
हिंदी दिवसाचे अैाचित्य साधत आयोजित केलेल्या राजभाषा संमेलनासाठी देशभरातून हिंदी भाषिक मंडळांचे पदाधिकारी, सदस्य, अधिकार्यांना वाशीत विशेष निमंत्रित केले आहे. याच भागात या मंडळींची राहण्याची, खान-पानाची विशेष व्यवस्था केली जाणार आहे. सिडको प्रदर्शनी केंद्राचा संपूर्ण परिसर त्यासाठी राखीव ठेवला आहे. या कार्यक्रमाची रूपरेखा नेमकी कशी असेल याविषयी येत्या आठवडाभरात स्पष्टता देण्यात येणार आहे. यानिमित्ताने हिंदी भाषकांचा मोठा मेळावादेखील येथे घेण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
१४, १५ सप्टेंबरला आयोजन
केंद्र सरकारमार्फत १४ आणि १५ सप्टेंबर रोजी सहावे अखिल भारतीय राजभाषा संमेलनासाठी दोन दिवस वाशी येथील सिडको प्रदर्शनी केंद्र राखीव ठेवण्यात आले आहे. या दोन दिवसांपैकी एक दिवस केंद्रीय गृहमंत्री अमित शहा वाशीत असणार आहेत. शहा यांच्यासह केंद्र तसेच राज्य सरकारमधील वरिष्ठ मंत्री, अधिकारी, सदस्यांचा मोठा लवाजमा याच काळात वाशी तसेच आसपासच्या परिसरात असेल.
१० हजारांवर वाहनक्षमतेसाठी जागेचे नियोजन
सिडको प्रदर्शनी केंद्र तसेच आसपासच्या भागात दहा हजारांहून अधिक वाहनांसाठी विशेष वाहनतळाची उपलब्धता केली जात आहे. वाशी येथील तुंगा हॉटेलसमोरील वाहनतळाची जागा यासाठी ताब्यात घेण्याचे नियोजन सुरू आहे. विशेष पोलीस दल तसेच सुरक्षा व्यवस्थेच्या नियोजनासाठी पोलीस दलाकडून आढावा बैठका सुरू आहे, अशी माहिती नवी मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकार्याने ‘लोकसत्ता’ला दिली.
