नवी मुंबई : वाशी येथील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (एपीएमसी) दाणा मार्केटमध्ये तांदळाच्या गोण्यांची उंच रचलेली थप्पी अंगावर कोसळल्याने एका ३७ वर्षीय हमालाचा मृत्यू झाला. मंगळवारी (३ नोव्हेंबर) सायंकाळी दुकानात काम करत असताना ही दुर्घटना घडली. रामराज लौटु असे मृत कामगाराचे नाव असून, या घटनेमुळे दाणा मार्केटमधील कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.

रामराज लौटु हे तुर्भे स्टोअर्स परिसरात वास्तव्यास होते. मूळचे उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातील आनंदगढ येथील असलेले रामराज एपीएमसी दाणा मार्केटमधील ‘श्रीराम कल्याणजी ॲग्रो’ (एम/३) या दुकानात हमालीचे काम करत होते. मंगळवारी सायंकाळी दुकानात काम सुरू असताना तांदळाच्या गोण्यांची रचलेली उंच थप्पी अचानक त्यांच्या अंगावर कोसळली. त्यामुळे जड गोण्यांखाली ते दबले गेले. या घटनेने दुकानातील कामगारांची धावपळ उडाली. इतर कामगारांनी तातडीने गोण्या बाजूला करून रामराज यांना बाहेर काढले. मात्र, त्यांना गंभीर दुखापत झाली होती आणि ते बेशुद्ध अवस्थेत होते.

सहकाऱ्यांनी त्यांना तातडीने वाशी येथील पी. के. सी. रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर सायंकाळी ५ वाजून ३६ मिनिटांनी त्यांना मृत घोषित केले. कामाच्या ठिकाणी घडलेल्या या दुर्घटनेत एका कामगाराचा जीव गेल्याने बाजार आवारातील मालाच्या साठवणुकीची पद्धत आणि सुरक्षेच्या उपाययोजनांचा मुद्दा उपस्थित झाला आहे.

दरम्यान, या घटनेची माहिती मृत कामगाराचे भाऊ राजकुमार लौटु यांनी एपीएमसी पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश मांडवे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील मोहिते यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. फॉरेन्सिक पथकानेही घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील मोहिते करीत आहेत.