नवी मुंबई : वाशी येथील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) फळ बाजारात विक्रीयोग्य नसल्याने कचऱ्यात टाकण्यात येणारी फळे काहीजण बाजार समितीच्या आवाराबाहेर विकत असल्याची बाब पुढे आली आहे. त्यामुळे अन्नसुरक्षेचा प्रश्न उपस्थित होत आहे.
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे घाऊक फळबाजारातील व्यवहारांवर परिणाम झाला आहे. किरकोळ व्यापाऱ्यांची उपस्थिती घटल्याने मोठ्या प्रमाणात फळे पडून राहतात. पावसामुळे खराब झालेली किंवा निर्यातीसाठी अयोग्य ठरलेली फळे व्यापाऱ्यांकडून कचऱ्यात टाकली जातात. त्यानंतर त्यांपैकी बाहेरून चांगली दिसणारी फळे काहीजण वेचून पोत्यांमध्ये भरून बाजार समितीच्या आवाराबाहेर नेत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
या फळांची एपीएमसी परिसरातील पदपथांवर तसेच मुंबई, ठाणे आणि परिसरातील काही किरकोळ बाजारपेठांमध्ये कमी दरात विक्री होत असल्याची चर्चा व्यापारी वर्तुळात आहे. कचऱ्यात पडलेल्या फळांचा धूळ, चिखल आणि इतर कचऱ्याशी संपर्क आलेला असण्याची शक्यता असल्याने ती ग्राहकांपर्यंत पोहोचत असतील, तर सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने हा गंभीर विषय ठरू शकतो.
या संदर्भात फळबाजाराचे उपसचिव राजेंद्र कोंडे यांनी सांगितले की, बाजार समितीचे काम शेतकरी आणि शेतमालाचे संरक्षण करणे आहे. बाजारात खराब झालेला माल आल्यास त्याचा पंचनामा करून संबंधित शेतकऱ्याला माहिती दिली जाते. त्यानंतर अनेकदा शेतकरी किंवा लहान व्यापारी तो माल फेकून देण्याऐवजी कमी दरात विकण्याचा निर्णय घेतात. मात्र, कचऱ्यात टाकलेला शेतमाल कोणी बाजार समितीच्या आवाराबाहेर नेऊन विक्री करत असेल, तर त्यावर बाजार समितीचे नियंत्रण राहत नाही. अशा प्रकारांवर संबंधित प्रशासकीय यंत्रणांनी कारवाई करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
उपाययोजनांची आवश्यकता
पावसाळ्याच्या काळात घाऊक बाजारात मोठ्या प्रमाणात भाजीपाला आणि फळे खराब होऊन कचऱ्यात जात असल्याने अशा मालाची विल्हेवाट अधिक प्रभावीपणे लावणे, बाजार परिसरात देखरेख वाढविणे आणि कचऱ्यातील फळे पुन्हा विक्रीस जाणार नाहीत, यासाठी समन्वयाने उपाययोजना करण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे. अन्न व औषध प्रशासन, नवी मुंबई महानगरपालिका आणि संबंधित यंत्रणांनी या प्रकाराची दखल घेऊन वस्तुस्थितीची पडताळणी करावी, अशी अपेक्षा व्यापारी व ग्राहकांकडून व्यक्त होत आहे.
कारवाईनंतरही विक्री कायम
एपीएमसी परिसरातील पदपथांवर फळे आणि भाजीपाल्याची विक्री करणाऱ्या फेरीवाल्यांविरोधात नवी मुंबई महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून वेळोवेळी कारवाई करण्यात येते. माल जप्त करणे, पदपथ मोकळे करणे अशा कारवाया वारंवार होत असल्या, तरी काही दिवसांतच परिस्थिती पुन्हा पूर्ववत होत असल्याचे दिसून येते. कारवाईदरम्यान फेरीवाले आणि महापालिकेच्या पथकांमध्ये वादावादी, धक्काबुक्की तसेच काही वेळा हाणामारीचे प्रकारही घडल्याची नोंद आहे. त्यामुळे केवळ कारवाई करून हा प्रश्न सुटत नसल्याचे स्पष्ट होत असून, एपीएमसी परिसरातील अनधिकृत विक्री रोखण्यासाठी महापालिका, एपीएमसी प्रशासन, पोलीस आणि अन्न व औषध प्रशासन यांनी समन्वयाने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
