नवी मुंबई : वाशी येथील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (एपीएमसी) घाऊक भाजीपाला बाजारात गेल्या १५ ते २० दिवसांत भाज्यांच्या दरात मोठी उलथापालथ झाली आहे. पावसामुळे काही भागांतून भाजीपाल्याची आवक वाढल्याने अनेक भाज्यांचे दर घसरले. मात्र, लिंबू, टोमॅटो आणि कोथिंबिरीची आवक तुलनेने कमी झाल्याने त्यांच्या दरात मोठी वाढ झाली आहे.

बाजारातील माहितीनुसार २० ऑगस्टला २५ रुपये किलो असलेला लिंबाचा घाऊक दर १ सप्टेंबरला ३८ रुपयांवर आणि सोमवार, ७ सप्टेंबरला ५५ रुपयांवर पोहोचला. त्यामुळे अवघ्या पंधरा दिवसांत लिंबाच्या दरात १२० टक्के वाढ झाली. टोमॅटोचा दरही १४ रुपयांवरून २२.५० रुपये किलो झाला असून, त्यात ६०.७ टक्के वाढ झाली. नाशिक भागातील कोथिंबिरीचा दर ६ रुपयांवरून ११ रुपये किलो झाला असून, त्यात ८३.३ टक्के वाढ झाली आहे.

दुसरीकडे, नवीन भाजीपाल्याची आवक वाढल्याने वांगी, भेंडी, दुधी भोपळा आणि फरसबीसह अनेक भाज्यांचे दर कमी झाले आहेत. वांग्याचा दर ३२ रुपयांवरून १७ रुपये किलो झाला असून, ४६.९ टक्के घट झाली. दुधी भोपळा २१ रुपयांवरून १३ रुपये, भेंडी ३५ रुपयांवरून २२ रुपये आणि फरसबी ४५ रुपयांवरून ३० रुपये किलो झाली आहे. गवारीचाही दर ६० रुपयांवरून ५० रुपये किलो झाला आहे. गाजराचा दर मात्र २० रुपयांवरून २४ रुपये किलो झाला आहे.

टोमॅटो आणि लिंबाच्या दरवाढीमागे मात्र आवक घटणे हा प्रमुख घटक आहे. नाशिक, जुन्नर आणि अन्य उत्पादक पट्ट्यांमध्ये झालेल्या पावसाचा काही भागातील पिकांच्या आवकेवर परिणाम झाला आहे. मागणी कायम असताना आवक कमी झाल्याने दर वाढले आहेत. दुसरीकडे कोथिंबिरी पावसाळ्यात लवकर खराब होत असल्याने तिच्या दरातही झपाट्याने वाढ झाली आहे.

एपीएमसीतील घाऊक दर कमी झाले असले तरी त्याचा पूर्ण परिणाम किरकोळ बाजारात दिसत नाही. वाहतूक, हाताळणी आणि विक्रेत्यांचा खर्च यामुळे किरकोळ बाजारातील दर घाऊक दरापेक्षा साधारण १० ते २० रुपये अधिक असतात. त्यामुळे काही भाज्या स्वस्त झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला असला तरी लिंबू, टोमॅटो आणि कोथिंबिरीच्या वाढलेल्या दराचा फटका कायम आहे.

अवक वाढण्याची शक्यता

मराठवाडा वगळता महाराष्ट्रात चांगल्या पावसामुळे भाज्यांचे उत्पादन वाढले. त्यामुळे बाजारातील आवक वाढली असून, काही भाज्यांचे दर मोठ्या प्रमाणात कमी झाले आहेत. आगामी काळातही आवक वाढलेली राहण्याची शक्यता आहे. दिवाळीनंतर गुजरातसह अन्य भागांतून आणि स्थानिक भागातून मालाची आवक आणखी वाढेल, अशी माहिती ऋषी डोके यांनी दिली. दरम्यान, थेट पणन पद्धतीमुळे एपीएमसीतील थेट आवकेवर ५० ते ६० टक्क्यांचा परिणाम झाल्याचा दावा व्यापाऱ्यांनी केला आहे. स्थानिक गावांमधील काही माल थेट विरार, बोरीवली, दादर तसेच अन्य बाजारपेठांकडे जात असल्याने मुंबई एपीएमसीत त्याची आवक कमी होत आहे. त्यामुळे बाजारातील व्यवहारावरही त्याचा परिणाम होत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

पालिकेच्या कारवाईचा परिणाम

महापालिकेकडून सुरू असलेल्या अतिक्रमणविरोधी आणि अनधिकृत व्यवसायाविरोधातील कारवाईमुळेही बाजारातील व्यवसायावर परिणाम होत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. बाजारात विक्रीसाठी येणारा माल योग्य ठिकाणी विकला गेला नाही, तर त्याचा परिणाम संपूर्ण व्यवहार साखळीवर होत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.