नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (एपीएमसी) कांदा-बटाटा बाजारात ५० किलोपेक्षा अधिक वजनाच्या गोण्या उतरविण्यास माथाडी कामगारांनी गुरुवारी नकार दिला. यामुळे आवक व्यवस्थेवर परिणाम झाला. ५० किलोपर्यंतच्या गोण्यांची चढ-उताराची कामे सुरळीत सुरू असली, तरी त्यापेक्षा अधिक वजनाच्या गोण्या गाड्यांमध्येच राहिल्याने व्यापाऱ्यांसमोर मालाची हाताळणी आणि विक्रीचा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रश्नावर शुक्रवारी कामगार आणि व्यापारी संघटनांची बैठक होणार असून, त्यातून तोडगा निघण्याची अपेक्षा आहे.

माथाडी कामगारांनी ५० किलोपेक्षा अधिक वजनाच्या गोण्या उचलणार नसल्याची भूमिका यापूर्वीच स्पष्ट केली होती. त्यानुसार गुरुवारी सकाळपासून त्याची अंमलबजावणी करण्यात आली. बाजारात ५० किलोपर्यंतच्या गोण्यांची चढ-उताराची कामे सुरू होती. मात्र, ५१-५२ किलोपासून अधिक वजनाच्या गोण्या उतरविण्यात आल्या नाहीत. काही गोण्यांचे वजन ५२ ते ५५ किलो, तर काही गोण्यांचे वजन ६० ते ६१ किलोपर्यंत असल्याची माहिती एपीएमसी प्रशासनाने दिली.

सुरक्षा यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीनुसार, जादा वजनाच्या गोण्या असलेल्या कांद्याच्या सुमारे ३८ आणि बटाट्याच्या १७ गाड्या बाजारात उभ्या आहेत. त्यामुळे माल बाजारात दाखल होऊनही त्याची पुढील प्रक्रिया रखडली आहे.

शुक्रवारी सकाळी माथाडी कामगार संघटना त्यांच्या सदस्यांची बैठक घेणार असून त्यानंतर व्यापारी संघटनांशी चर्चा होणार आहे. दरम्यान, मंत्री जयकुमार रावल यांनी माथाडी नेते नरेंद्र पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली असून, पुढील आठ ते दहा दिवसांत संबंधितांची बैठक घेऊन मार्ग काढण्याचे आश्वासन दिले आहे. बैठकीत होणाऱ्या निर्णयाची कडक अंमलबजावणी केली जाईल, असे मुंबई एपीएमसीचे सचिव राजाराम धोंडकर यांनी सांगितले.

आवक वळण्याची व्यापाऱ्यांना धास्ती

जादा वजनाच्या गोण्यांचा प्रश्न कायम राहिल्यास बाहेरून शेतमाल मागविणे थांबविण्याचा इशारा व्यापाऱ्यांनी दिला आहे. बाहेरच्या बाजारपेठांमधून येणाऱ्या मालाचे वजन अधिक असते आणि त्याचा फटका एपीएमसीतील व्यापाऱ्यांना बसत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. काम बंद राहिल्यास कांदा, बटाटा आणि लसूण यांची आवक कमी होऊन मुंबईच्या पुरवठा व्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ५० किलोपेक्षा अधिक वजनाच्या गोण्या बाजारात पाठवू नयेत, अशा सूचना संबंधित व्यापाऱ्यांना देण्याचे आवाहन एपीएमसी प्रशासनाने व्यापारी संघटनांना केले आहे.