नवी मुंबई : कांदा-बटाटा बाजारातील ५० किलो वजन मर्यादेवरून माथाडी कामगार आणि व्यापाऱ्यांमध्ये निर्माण झालेल्या संघर्षावर शुक्रवारी तात्पुरता तोडगा निघाला. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (एपीएमसी) दालनात झालेल्या संयुक्त बैठकीत सध्या बाजारात असलेल्या शेतमालाच्या ५२ किलोपर्यंतच्या गोण्यांचे चढ-उताराचे काम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे गुरुवारी बंद असलेले काम पुन्हा सुरू झाले असून बाजारातील व्यवहार सुरळीत झाल्याचा दावा कांदा-बटाटा आडत व्यापारी संघटनेने केला आहे. मात्र, वजनमर्यादेबाबत अंतिम निर्णय मंगळवारी पणन मंत्री जयकुमार रावल यांच्याबरोबरच्या बैठकीत होणार आहे.

५० किलोपेक्षा अधिक वजनाच्या गोण्या उचलण्याच्या मुद्द्यावरून गुरुवारी कांदा-बटाटा बाजारातील व्यवहारावर परिणाम झाला होता. शुक्रवारी व्यापाऱ्यांनी बाजार बंद ठेवला, तर माथाडी कामगारांनी ५० किलो वजनमर्यादेचीच अंमलबजावणी करण्याची भूमिका घेतली. या प्रश्नावरून माथाडी कामगारांनी रस्त्यावर उतरुन आंदोलन केल्याने बाजार परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

शासनाच्या आदेशानुसार ५० किलो वजनाच्या गोण्या बाजारात आणण्याची मागणी माथाडी कामगारांकडून केली जात आहे. नाशवंत माल असल्याने वजनामध्ये काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. मात्र, वजनमर्यादेच्या अंमलबजावणीच्या मुद्द्यावरून दोन्ही बाजूंमध्ये मतभेद निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर बाजार समितीच्या दालनात माथाडी कामगार आणि व्यापारी प्रतिनिधींची संयुक्त बैठक घेण्यात आली.

बैठकीनंतर सध्या बाजारात आलेल्या शेतमालाचे चढ-उताराचे काम ५२ किलोपर्यंत सुरू करण्याचे ठरले. माथाडी कामगारांनीही ५२ किलोपर्यंतच्या गोण्या उतरविण्यास तयारी दर्शवली आहे. त्यामुळे बाजारातील बंद असलेले काम पुन्हा सुरू झाले. व्यापाऱ्यांनीही बाजारातील व्यवहार सुरू ठेवण्याची भूमिका घेतली आहे.दरम्यान, संयुक्त बैठकीनंतर कांदा-बटाटा आडत व्यापारी संघटनेने सभासद आडते आणि व्यापाऱ्यांना सूचना जारी केली आहे. सध्या बाजारातील व्यवहार सुरळीत सुरू झाले असून ५० किलोपेक्षा अधिक वजनाचा माल मागवू नये, अशी सूचना संघटनेने केली आहे. जादा वजनाचा शेतमाल मागविल्यास संबंधित आडते अथवा व्यापारी जबाबदार राहतील, असेही संघटनेने स्पष्ट केले आहे.

मंगळवारी अंतिम निर्णय

सध्या ५२ किलोपर्यंतच्या मालाचे चढ-उतार सुरू ठेवण्याचा तात्पुरता निर्णय झाला असला, तरी वजन मर्यादेचा अंतिम निर्णय मंगळवारच्या बैठकीत होणार आहे. पणन मंत्र्यांबरोबरच्या बैठकीत शासनाचे आदेश, नाशवंत मालाच्या वजनातील संभाव्य तफावत आणि माथाडी कामगारांच्या कामाची पद्धत यावर चर्चा होणार आहे. या बैठकीतील निर्णयानंतर बाजारातील वजन मर्यादेबाबतची पुढील भूमिका स्पष्ट होणार आहे.

आम्ही ५२ किलोपर्यंत वजनमर्यादा असलेल्या गाड्यांचा माल उतरविण्यास सुरुवात केली आहे. मंगळवारी पणन मंत्री जयकुमार रावल यांच्याबरोबर बैठक आयोजित करण्यात आली आहे. बैठकीत जो निर्णय होईल, त्यानंतर आमची पुढील भूमिका आम्ही स्पष्ट करू.- नरेंद्र पाटील, माथाडी कामगार नेते