नवी मुंबई : वाशी येथील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) परिसरात आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय मोफत मुख कर्करोग पूर्वतपासणी शिबिरातून धक्कादायक वास्तव समोर आले आहे. २६ आणि २७ मे रोजी झालेल्या या शिबिरात तपासणी करण्यात आलेल्या ३८९ जणांपैकी तब्बल ७५ जणांमध्ये मुखाच्या कर्करोगाची लक्षणे आढळून आली. त्यापैकी २१ जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तातडीने ‘बायोप्सी’ चाचणीसाठी संदर्भित करण्यात आले आहे. या आकडेवारीमुळे एपीएमसी परिसरात तंबाखू आणि गुटखा सेवनाचे वाढते प्रमाण पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
जागतिक तंबाखूविरोधी दिनानिमित्त हे शिबिर पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या मार्गदर्शनाखाली आणि एपीएमसी सचिव शरद जरे यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आले होते. टाटा मेमोरियल सेंटर आणि वर्ल्ड अॅग्रो केअर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने एपीएमसीच्या पाच बाजारांपैकी मसाला आणि फळ बाजारात ही मोहीम राबवण्यात आली. तंबाखूमुळे होणाऱ्या गंभीर आजारांचे लवकर निदान आणि जनजागृती व्हावी हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता.
शिबिरातील निष्कर्षांवरून एपीएमसी परिसरात काम करणारे माथाडी कामगार, मापाडी, सफाई कर्मचारी आणि व्यापाऱ्यांमध्ये तंबाखू सेवनाचे प्रमाण चिंताजनकरीत्या वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, बाजार आवारातील मोठ्या गर्दीच्या तुलनेत तपासणी शिबिराला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याची खंत वैद्यकीय पथकाने व्यक्त केली. पानटपऱ्यांवर गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थ खरेदीसाठी मोठ्या रांगा दिसत असताना आरोग्य तपासणीबाबत मात्र अनास्था दिसून आल्याचे निरीक्षण वैद्यकीय पथकाकडून व्यक्त करण्यात आले.
एपीएमसीच्या पाच प्रमुख बाजार विभागांमध्ये शंभरहून अधिक पानटपऱ्या सुरू असून त्यापैकी मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांची खुलेआम विक्री होत असल्याचा आरोप बाजार घटक करत आहेत. अन्न व औषध प्रशासनाकडून अधूनमधून कारवाई करून काही टपऱ्या सील केल्या जात असल्या तरी काही महिन्यांतच त्या पुन्हा सुरू होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे प्रतिबंधित विक्री रोखण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याची टीका बाजार घटकांकडून होत आहे.
दरम्यान, तंबाखूमुक्तीसाठी केवळ जनजागृती न करता सातत्यपूर्ण आणि कठोर अंमलबजावणी आवश्यक असल्याची मागणी व्यापारी व कामगारांकडून करण्यात येत आहे. वेळीच प्रभावी उपाययोजना न केल्यास भविष्यात मुखाच्या कर्करोगाचे प्रमाण आणखी वाढण्याची भीती आरोग्य तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
“माथाडी कामगार आणि इतर बाजार घटकांमध्ये तंबाखू सेवनाचे वाढते प्रमाण गंभीर बाब आहे. भविष्यात त्यांना कर्करोगासारख्या गंभीर आजारांचा सामना करावा लागू नये म्हणून वेळीच निदान करण्यासाठी हे तपासणी शिबीर घेण्यात आले होते. गंभीर लक्षणे असलेल्यांना पुढील उपचारांसाठी मार्गदर्शन केले जाणार आहे. कर्करोगावर वेळेत उपचार घेता यावेत म्हणून सर्व बाजार घटकांना कर्करोग निदान चाचणी करून घ्यावी असे आमचे त्यांना आवाहन राहील.”
- डॉ. अजय पाटील, वैद्यकीय अधिकारी, मुंबई एपीएमसी
