नवी मुंबई : वाशी येथील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (एपीएमसी) कांदा-बटाटा बाजारात कांद्याच्या दरवाढीची धग कायम आहे. महिनाभरापूर्वी घाऊक बाजारात किलोमागे २० ते ३० रुपयांच्या दरात विकला जाणारा कांदा सध्या ३० ते ४५ रुपयांपर्यंत पोहोचला आहे. चांगल्या प्रतीच्या कांद्याला सर्वाधिक दर मिळत असून, पुढील दोन ते तीन महिने दर चढे राहण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. पावसामुळे कांदा खराब होण्याचे वाढलेले प्रमाण आणि बाजारात चांगल्या प्रतीच्या कांद्याची घटलेली उपलब्धता यामुळे दरात वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे.
एपीएमसीमध्ये मंगळवारी कांद्याच्या सुमारे १०० गाड्यांची आवक झाली. महिनाभरापूर्वी ही आवक १०० ते १५० गाड्यांच्या आसपास होती. मात्र, आवक कमी होण्याबरोबरच आलेल्या मालाच्या गुणवत्तेचा प्रश्न अधिक गंभीर झाला आहे. पूर्वी बाजारात येणाऱ्या कांद्यापैकी ८० ते ९० टक्के माल चांगल्या प्रतीचा असायचा. आता चांगला आणि खराब माल जवळपास समान प्रमाणात येत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
कांदा काढणीच्या काळात झालेल्या पावसाचा परिणाम साठवणुकीतील मालावर झाला आहे. पावसामुळे कांद्यामध्ये ओलावा वाढल्याने साठवणुकीत तो खराब होण्याचे प्रमाण वाढले. त्यामुळे शेतकऱ्यांकडील साठवलेला कांदा बाजारात आणला जात असला, तरी त्यातील मोठ्या प्रमाणातील माल खराब निघत आहे. परिणामी प्रत्यक्ष विक्रीसाठी उपलब्ध होणाऱ्या चांगल्या कांद्याचे प्रमाण कमी झाले आहे.
राज्यातील प्रमुख बाजारांमध्येही कांद्याच्या दरात वाढ झाल्याचे बाजारभावातून स्पष्ट होते. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या २५ ऑगस्टच्या माहितीनुसार, लासलगावमध्ये उन्हाळी कांद्याचा कमाल दर ४,५५२ रुपये प्रतिक्विंटल, तर नाशिकमध्ये ४,५०० रुपये प्रतिक्विंटल नोंदविण्यात आला. नाशिक बाजारातील सर्वसाधारण दरही ११ ऑगस्टच्या २,४०० रुपयांवरून २५ ऑगस्टला ३,८५० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत वाढला आहे.
केंद्र सरकारने कांदा उत्पादकांकडून खरेदीचा दरही जुलैमध्ये १,८७५ रुपयांवरून २,१२५ रुपये प्रतिक्विंटल केला होता. मात्र सध्या बाजारातील दरवाढीमागे गुणवत्तापूर्ण मालाची कमतरता हा महत्त्वाचा घटक ठरत असल्याचे निरीक्षण एपीएमसीतील व्यापाऱ्यांनी नोंदविले आहे. आगामी काळात नवीन कांद्याची आवक वाढेपर्यंत बाजारातील पुरवठ्यावर दबाव राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील दोन ते तीन महिन्यांत कांद्याच्या दरात आणखी वाढ होऊ शकते, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
‘कांदा एक्स्प्रेस’च्या फेऱ्यांमध्ये वाढ
कांद्याच्या वाढत्या दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारकडून बफर साठ्यातील कांदा बाजारात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. नाशिकहून देशातील प्रमुख बाजारपेठांकडे कांदा पोहोचविण्यासाठी ‘कांदा एक्स्प्रेस’च्या फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत. मात्र, केवळ वाहतूक वाढवून दरवाढीवर नियंत्रण मिळविणे कठीण असल्याचे मुंबई एपीएमसीतील व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. साठवणुकीतील कांदा मोठ्या प्रमाणात खराब होत असल्यास बाजारात प्रत्यक्ष उपलब्ध होणाऱ्या चांगल्या मालाचे प्रमाण कमीच राहणार आहे. त्यामुळे ‘कांदा एक्स्प्रेस’मुळे काही शहरांमध्ये पुरवठा सुधारला तरी खराब होणाऱ्या मालाचा प्रश्न कायम राहण्याची शक्यता आहे.
सध्या चांगल्या प्रतीचा कांदा बाजारात कमी असल्याने आणि मोठ्या प्रमाणात कांदा खराब होत असल्याने दर वाढले आहेत. बकरी ईद आणि रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर कांदा-बटाटा बाजार बंद राहणार आहे. त्यामुळे कांद्याच्या पुरवठा साखळीवर परिणाम होऊ शकतो. परिणामी, कांद्याच्या दरात अधिक वाढ होण्याची शक्यता आहे.- मनोहर तोतलानी, कांदा-बटाटा व्यापारी, मुंबई एपीएमसी
