नवी मुंबई : रिक्षाच्या १५० रुपयांच्या भाड्यावरून झालेल्या वादातून १८ वर्षीय रिक्षाचालकाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. २९ ऑगस्टच्या पहाटे वाशीतील फोर्टिस रुग्णालयाजवळील मिनी सी-शोअर गार्डन परिसरात ही घटना घडली. घटनेनंतर रिक्षा घेऊन पसार झालेल्या दोन्ही आरोपींचा माग काढत नवी मुंबई गुन्हे शाखा आणि वाशी पोलिसांनी मानखुर्द परिसरातून त्यांना अटक केली.

सुजनकुमार फेकु महतो (१८), रा. घणसोली, हा २८ ऑगस्ट रोजी सायंकाळी नेहमीप्रमाणे रिक्षा घेऊन प्रवासी वाहतुकीसाठी बाहेर पडला होता. २९ ऑगस्ट रोजी पहाटे सुमारे ३.३६ वाजता कोपरखैरणे रेल्वे स्थानक परिसरातून दोन तरुण त्याच्या रिक्षात बसले. त्यांनी मानखुर्द येथे जाण्यास सांगितले. या प्रवासासाठी १५० रुपये भाडे असल्याचे सुजनने सांगितले. मात्र, दोघांकडे १०० रुपयेच असल्याने भाड्यावरून त्यांच्यात वाद झाला.

यानंतर रिक्षा सेक्टर-५ येथील हनुमान मंदिर परिसरात आली. येथे दोघांनी धारदार शस्त्र दाखवून सुजनला धमकावल्याचा आरोप आहे. त्यानंतर त्याला रिक्षा पुढे नेण्यास भाग पाडण्यात आले. काही अंतर पुढे गेल्यानंतर वाशीतील फोर्टिस रुग्णालयाजवळील मिनी सी-शोअर गार्डन परिसरात सुजनला अन्य ग्राहकाचा फोन आला. त्यामुळे त्याने रिक्षातील दोन्ही प्रवाशांना खाली उतरण्यास सांगितले.

यावरून पुन्हा वाद झाला. यावेळी दोन्ही आरोपींनी धारदार शस्त्राने सुजनच्या मानेवर, डोक्यावर आणि हातावर वार केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. गंभीर जखमी झालेला सुजन खाली कोसळला. त्याचा मृत्यू झाल्यानंतर आरोपी त्याची रिक्षा घेऊन घटनास्थळावरून पसार झाले.

सीसीटीव्हीच्या आधारे तपास

घटनेची माहिती मिळताच वाशी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन नवी मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष-१ आणि मध्यवर्ती कक्षासह वाशी पोलिसांची स्वतंत्र तपास पथके तयार करण्यात आली. आरोपींचा माग काढण्यासाठी घटनास्थळापासून त्यांच्या संभाव्य मार्गावरील सीसीटीव्ही चित्रण तपासण्यात आले. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यात आली.

तपासादरम्यान आरोपींची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले. त्यानंतर साहील आनंदा सुर्वे (२०) आणि साहील यशवंत खरात (२०), दोघेही महाराष्ट्र नगर, मानखुर्द, यांना पोलिसांनी मानखुर्द परिसरातून ताब्यात घेतले. चौकशीत दोघांनी गुन्ह्यात सहभागाची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, साहील सुर्वे याच्यावर यापूर्वी ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत आणि शस्त्र कायद्यांतर्गत गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी नमूद केले. ७ ऑक्टोबर २०२५ रोजी तो जामिनावर कारागृहातून बाहेर आला होता, अशी माहिती तपासात समोर आली आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास वाशी पोलीस करीत आहेत. पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, सहपोलीस आयुक्त दीपक साकोरे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) प्रमोद शेवाळे आणि पोलीस उपायुक्त (गुन्हे) सचिन गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा आणि वाशी पोलिसांच्या पथकांनी ही कारवाई केली.