नवी मुंबई : वाशी सेक्टर-९ येथील अवनी सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या पुनर्विकास प्रकल्पासाठी रस्त्याची प्रत्यक्ष रुंदी आणि महापालिकेच्या नोंदीतील रुंदी यामध्ये तफावत असल्याचा आरोप पुढे आला आहे. सोसायटीकडे जाणारा रस्ता प्रत्यक्षात १२ मीटरचा असताना कागदोपत्री ३२ मीटर रुंदीचा रस्ता गृहीत धरून अतिरिक्त एफएसआयचा लाभ देण्यात आल्याचा दावा भाजप नगरसेवक भरत नखाते यांनी केला आहे. या प्रकरणाची चौकशी करून तोपर्यंत संबंधित बांधकामाच्या परवानग्यांना स्थगिती द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. याबाबतचे महत्वाचे प्रश्न येत्या शुक्रवारी (१८ सप्टेंबर) होणाऱ्या महासभेत उपस्थित करण्यात येणार असून, यावर वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे.

रस्त्याची रुंदी ही बांधकाम प्रकल्पाला अनुज्ञेय एफएसआय निश्चित करताना महत्त्वाचा घटक ठरते. त्यामुळे नोंदीतील रस्त्याची रुंदी आणि प्रत्यक्ष रस्त्याची स्थिती यामध्ये फरक असल्यास त्याचा थेट परिणाम बांधकामाची क्षमता आणि प्रकल्पाला मिळणाऱ्या विकास हक्कांवर होऊ शकतो. अवनी सोसायटीच्या पुनर्विकासात अशाच प्रकारे ३२ मीटर रस्ता गृहीत धरून सुमारे ३ एफएसआयचा लाभ देण्यात आल्याचा नखाते यांचा आक्षेप आहे.

त्यामुळे महापालिकेच्या नगररचना विभागाने संबंधित प्रकल्पाला कोणत्या आधारावर बांधकाम परवानग्या दिल्या, तसेच रस्त्याची रुंदी निश्चित करण्यासाठी कोणती कागदपत्रे आणि मोजमाप ग्राह्य धरले, याची माहिती महासभेत मागविण्यात आली आहे. प्रत्यक्ष जागेवरील रस्ता १२ मीटरचा असल्यास ३२ मीटर रस्त्याच्या आधारे मिळालेल्या एफएसआयची वैधता तपासण्याची आवश्यकता असल्याचे नखाते यांनी म्हटले आहे.

या प्रकरणात केवळ एफएसआयचा मुद्दाच नसून वाढीव बांधकामामुळे परिसरातील पायाभूत सुविधांवर होणाऱ्या परिणामाचाही प्रश्न उपस्थित होतो. विशेषतः अरुंद रस्त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत अग्निशमन वाहने किंवा इतर मदत यंत्रणांना इमारतीपर्यंत पोहोचण्यात अडचणी येऊ शकतात. पुनर्विकासानंतर रहिवाशांची संख्या वाढल्यास वाहतूक आणि आपत्कालीन व्यवस्थेवर अतिरिक्त ताण येण्याची शक्यताही तपासावी लागणार आहे.

परवानग्यांची चौकशी करण्याची मागणी

नखाते यांनी संबंधित प्रकल्पाला देण्यात आलेले बांधकाम सुरू करण्याचे प्रमाणपत्र (सीसी) आणि भोगवटा प्रमाणपत्र (ओसी) याबाबतही प्रश्न उपस्थित केले आहेत. चौकशी पूर्ण होईपर्यंत या परवानग्यांबाबत पुढील कार्यवाही स्थगित ठेवावी, अशी त्यांची मागणी आहे. रस्त्याची रुंदी निश्चित करताना कोणत्या अधिकाऱ्यांनी निर्णय घेतला आणि त्यावर आधारित एफएसआय मंजूर करण्याची प्रक्रिया कशी झाली, याचीही चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

नवी मुंबईतील अनेक जुन्या गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासाला वेग आला आहे. त्यामुळे पुनर्विकास प्रकल्पांना एफएसआय मंजूर करताना रस्त्याची प्रत्यक्ष उपलब्धता, नोंदीतील रुंदी आणि संबंधित विकास नियमांची पूर्तता यांची पडताळणी हा महत्त्वाचा मुद्दा ठरत आहे. अवनी सोसायटीबाबत उपस्थित झालेल्या आक्षेपांवर प्रशासन महासभेत कोणती माहिती देते आणि रस्त्याच्या रुंदीबाबत प्रत्यक्ष मोजमाप अथवा चौकशी केली जाते का, याकडे आता लक्ष लागले आहे.