नवी मुंबई : वाशी येथील सिडको प्रदर्शन व अधिवेशन केंद्रात सोमवारपासून सुरू होणाऱ्या सहाव्या अखिल भारतीय राजभाषा संमेलनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. देशभरातील विविध राज्यांतून केंद्र सरकारचे अधिकारी संमेलनासाठी नवी मुंबईत दाखल होणार असून, वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये यासाठी संमेलनस्थळाकडे येणाऱ्या प्रमुख महामार्गांसह महत्त्वाच्या मार्गांवर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
हिंदी दिवस २०२६ आणि सहाव्या अखिल भारतीय राजभाषा संमेलनाचे आयोजन सोमवार (ता. १४) आणि मंगळवार (ता. १५) असे दोन दिवस सिडको प्रदर्शन व अधिवेशन केंद्रात करण्यात आले आहे. देशभरातील केंद्र सरकारच्या विविध विभागांतील सुमारे सात हजार अधिकारी, राजभाषा कर्मचारी, साहित्यिक, शिक्षणतज्ज्ञ आणि विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ या संमेलनात सहभागी होणार आहेत. तसेच गणेशोत्सवाची सुरूवात सोमवारपासून होत असल्याने वाशी परिसरात मोठी वर्दळ अपेक्षित असल्याने पोलिसांनी वाहतूक नियोजनावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सोमवारी दुपारी १२ वाजून १० मिनिटांनी संमेलनस्थळी दाखल होणार असून काही तास संमेलनात उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच दोन्ही उपमुख्यमंत्रीही कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याने त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीनेही विशेष बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे.
संमेलनाच्या उद्घाटन सत्रात अमित शहा यांच्या हस्ते हिंदी शब्दकोष, ‘भारती’ अनुवाद तंत्रज्ञानावरील मोबाईल अॅप आणि पुण्यात उभारण्यात आलेल्या भाषा डेटा सेंटरचे लोकार्पण होणार आहे. या अॅपच्या माध्यमातून विविध भाषांमधील मजकुराचे जलद भाषांतर करता येणार आहे.
संमेलनस्थळाकडे जाणाऱ्या मार्गांवर वाहतूक पोलिसांसह स्थानिक पोलिसांची पथके तैनात करण्यात आली आहेत. प्रमुख चौक, महामार्गांचे जोडमार्ग आणि संमेलन केंद्राच्या परिसरात वाहनांची तपासणी तसेच वाहतुकीचे नियमन करण्यात येणार आहे. संमेलनासाठी येणाऱ्या वाहनांमुळे नियमित वाहतुकीवर परिणाम होऊ नये, यासाठी आवश्यकतेनुसार वाहतूक व्यवस्थेत बदल करण्याची तयारीही पोलिसांनी केली आहे.
दोन दिवसांच्या या संमेलनात हिंदीसह भारतीय भाषांमधील समन्वय, अनुवाद, तंत्रज्ञान आणि राजभाषेच्या प्रभावी वापरावर विविध सत्रांत चर्चा होणार आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडविणारे कार्यक्रमही आयोजित करण्यात आले आहेत. त्यामुळे संमेलनाच्या दोन्ही दिवशी वाशी परिसरात पोलिसांचा बंदोबस्त कायम राहणार आहे.
