नवी मुंबई : वाशी सेक्टर २६, कोपरी येथील सिडबी ऑफिसर्स क्वार्टर्सच्या बांधकामाच्या ठिकाणी काम सुरू असताना टेलिस्कोपिक मोबाइल क्रेन असंतुलित होऊन रस्त्यावर कोसळल्याची घटना रविवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडली. क्रेन रस्त्यावरून जाणाऱ्या कंटेनरवर कोसळल्याने कंटेनरच्या चालकाला किरकोळ दुखापत झाली. या घटनेमुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली.
कोपरी येथील पेट्रोल पंपाच्या मागे सिडबी ऑफिसर्स क्वार्टर्सच्या ठिकाणी सबरी कन्स्ट्रक्शनच्या वतीने बांधकाम सुरू आहे. या कामासाठी टेलिस्कोपिक मोबाइल क्रेनचा वापर करण्यात येत होता. रविवारी रात्री काम सुरू असताना क्रेन असंतुलित झाली आणि थेट रस्त्यावर कोसळली. त्याच वेळी रस्त्यावरून कंटेनर वाहन जात होते. क्रेन कंटेनरवर पडल्याने वाहनाचे नुकसान झाले असून, चालकाला किरकोळ दुखापत झाली.
घटनेनंतर बांधकामाच्या ठिकाणी असलेल्या कामगारांनी मदत करून रस्त्यावर कोसळलेली क्रेन हटवली. त्यामुळे काही काळ वाहतुकीला निर्माण झालेला अडथळा दूर करण्यात आला. रात्रीची वेळ असल्याने रस्त्यावर वर्दळ तुलनेने कमी होती. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर एपीएमसी पोलिसांनी घटनाक्रमाची माहिती घेतली. जखमी कंटेनर चालकाच्या जबाबाच्या आधारे संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील यांनी दिली.
क्रेन असंतुलित होण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. बांधकामाच्या ठिकाणी अवजड यंत्राचा वापर करताना आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या होत्या का, क्रेनचा वापर नियमानुसार होत होता का आणि दुर्घटनेसाठी नेमकी कोणाची जबाबदारी आहे, याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, या घटनेनंतर बांधकामाच्या ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. मुख्य रस्त्यालगत सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी अवजड यंत्रांचा वापर करताना नागरिक आणि वाहनांच्या सुरक्षिततेसाठी पुरेशी खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे या घटनेने पुन्हा अधोरेखित केले आहे.
