नवी मुंबई : मुंबईतील काही मोठ्या गणेशमूर्तींचे वाशी खाडीमध्ये विसर्जन करण्यात येते. त्यामुळे या परिसरात होणारी गर्दी आणि त्यातून निर्माण होणारी वाहतूक कोंडी नवी मुंबई पोलिसांसमोरचे प्रमुख आव्हान आहे. या पार्श्वभूमीवर नवी मुंबई पोलिसांच्या परिमंडळ-एक अंतर्गत वाशी विभागातील गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसोबत मंगळवारी समन्वय बैठक घेण्यात आली.

गणेशोत्सवासाठी आवश्यक परवानग्या मिळण्यास होणारा विलंब, मंडप उभारणी, वीजपुरवठा, सिडकोशी संबंधित बाबी तसेच पाणीपुरवठ्याच्या अडचणी मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी या बैठकीत मांडल्या. विविध विभागांशी समन्वय साधून या अडचणी लवकर सोडविण्याचे आश्वासन पोलिसांकडून देण्यात आले. मंडळांना प्रशासनाशी संपर्क साधताना अडचण येऊ नये यासाठी ‘एक गणपती, एक कर्मचारी’ या संकल्पनेनुसार पोलीस कर्मचारी नियुक्त केले जाणार आहेत.

मुंबईतील काही मोठ्या गणेशमूर्ती विसर्जनासाठी वाशी खाडी परिसरात येतात. त्यामुळे विसर्जनाच्या काळात वाशीतील प्रमुख रस्त्यांवर वाहनांची गर्दी होऊन वाहतुकीचा वेग मंदावण्याची शक्यता असते. मुंबईतील गणेश मंडळांशी समन्वय साधून विसर्जनाच्या वेळी वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक नियोजन केले जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. मात्र, यंदा पार्किंगचा प्रश्न पोलिसांसाठी विशेष चिंतेचा विषय ठरणार आहे. गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या संख्येने वाहने रस्त्यावर येतात; मात्र त्या तुलनेत उपलब्ध रस्ते आणि पार्किंगची जागा मर्यादित आहे. त्यामुळे वाहतुकीला अडथळा होणार नाही अशा पद्धतीने पार्किंगचे नियोजन करण्यावर पोलिसांचा भर राहणार आहे.गणेशोत्सवाच्या तयारीसंदर्भात दहीहंडी उत्सवात मंडळे, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी पोलिसांना सहकार्य केल्याचे सहआयुक्त दीपक साकोरे यांनी नमूद केले. त्याचप्रमाणे गणेशोत्सवातही मंडळांनी वाहतूक व्यवस्था आणि ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांनी केले.

गणेशोत्सव जवळ येत असताना मंडळांच्या परवानग्या आणि अन्य प्रशासकीय अडचणी वेळेत दूर करण्याबरोबरच विसर्जनाच्या दिवशी वाशीतील वाहतूक सुरळीत ठेवण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. मुंबईतील गणपतींच्या विसर्जनामुळे वाढणारी गर्दी, वाहनांचा ताण आणि पार्किंगची समस्या लक्षात घेता यंदाची वाहतूक व्यवस्था पोलिसांच्या नियोजनाची खरी कसोटी ठरणार आहे.

ध्वनीमर्यादेचे पालन बंधनकारक

गणेशोत्सवातील डीजे आणि ध्वनिक्षेपकांच्या वापराबाबतही बैठकीत चर्चा झाली. ध्वनी प्रदूषणाच्या नियमांनुसार शांतता क्षेत्र, औद्योगिक क्षेत्र तसेच दिवस आणि रात्रीसाठी निश्चित केलेल्या ध्वनीमर्यादांचे पालन करणे बंधनकारक राहणार आहे. नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी पोलिसांचे प्रशिक्षण झाले असून, नियमांचे उल्लंघन झाल्यास कायद्यानुसार कारवाई केली जाणार आहे.

मंडळांच्या परवानग्या, महावितरण, सिडको आणि पाणीपुरवठ्याशी संबंधित अडचणी संबंधित विभागांशी समन्वय साधून सोडविण्यात येतील. मुंबईतील काही मोठ्या गणेशमूर्तींच्या विसर्जनामुळे वाशीतील वाहतुकीवर ताण येतो. त्यासाठीही आवश्यक समन्वय ठेवला जाईल. वाहनांची संख्या वाढत असल्याने पार्किंगच्या नियोजनावर विशेष लक्ष देणार आहोत. ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे पालन केले जाईल आणि मंडळेही पोलिसांना सहकार्य करतील, अशी आशा आहे.- दीपक साकोरे, पोलीस सहआयुक्त, नवी मुंबई</strong>