लोकसत्ता प्रतिनिधी

नवी मुंबई : इमारतींच्या आवारातील सामायिक जागा आणि नागरिकांच्या वापरासाठी असलेल्या पदपथ व्यवसायासाठी वापरले जात आहेत. यामुळे पादचाऱ्यांना अनेकदा अडथळ्यांना सामोरे जावे लागते. या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महापालिकेच्या वाशी विभागाने अतिक्रमणविरोधी कारवाईला वेग दिला आहे. मागील दोन दिवसांत सेक्टर ९, १०, १५ आणि १६ या भागांत ५० ते ६० आस्थापना आणि अनधिकृत फेरीवाल्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाईतून १ लाख ४० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

वाशीतील काही भागांत दुकानांच्या बाहेरील सामायिक जागांमध्ये साहित्य ठेवणे, ग्राहकांसाठी जागा अडवणे किंवा व्यवसायाचा विस्तार करणे असे प्रकार दिसून येतात. त्याचबरोबर फेरीवाल्यांकडूनही पदपथ आणि नागरिकांच्या वापरातील जागा व्यापल्या जातात. त्यामुळे पादचाऱ्यांना उपलब्ध जागा कमी होते. अशा ठिकाणी पाहणी करून अतिक्रमणे हटविण्याबरोबरच संबंधितांकडून दंड वसूल करण्यात आला.

पावसाळ्याच्या काळात अतिक्रमणविरोधी कारवाईचा वेग काहीसा मंदावला होता. मात्र आता पुन्हा कारवाईला गती देण्यात आली आहे. वाशीतील इतर भागांतही पाहणी करून अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती वाशी विभागाचे सहाय्यक आयुक्त सुखदेव येडवे यांनी दिली. सामायिक जागा आणि पदपथ नागरिकांच्या वापरासाठी मोकळे ठेवण्याची जबाबदारी महापालिकेची असली तरी कारवाईनंतर त्याच ठिकाणी पुन्हा अतिक्रमण होऊ नये, यासाठी नियमित पाहणीची आवश्यकता आहे. त्यामुळे सध्याच्या कारवाईबरोबरच सातत्याने निरीक्षण ठेवण्याचे आव्हान महापालिकेसमोर आहे.

एसआयआरच्या कामामुळे मनुष्यबळावर ताण

महापालिका कर्मचाऱ्यांवर सध्या मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षणाच्या (एसआयआर) कामाचा मोठा भार आहे. त्यामुळे अतिक्रमण विभागाच्या नियमित कारवाईसाठी उपलब्ध मनुष्यबळावरही ताण येत असल्याचे महापालिका वर्तुळात बोलले जात आहे. सामायिक जागा, फेरीवाले आणि इतर अतिक्रमणांवर सातत्याने कारवाई करण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.