नवी मुंबई: वायुप्रदूषण आणि पर्यावरण संरक्षण हे मुद्दे थेट मनपा निवडणुकीच्या माध्यमातून समोर येण्यासाठी जनरेशन झेड ने वाशीतील मिनी सी शोर येथे मानवी साखळी उभा केली होती. या उपक्रमातून उमेदवार आणि प्रशासनाला स्पष्ट संदेश देण्यात आला—स्वच्छ हवा हा विशेषाधिकार नाही, तर मूलभूत हक्क आहे हे सांगण्यासाठी हा प्रयत्न केल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले. यावेळी स्वाक्षरी मोहीम हि राबवण्यात आली.
15 जानेवारीला होणाऱ्या महापालिका निवडणुक होणार आहेत. सध्या राजकीय घडामोडी सुरु असून उमेदवार निश्चिती झाल्यावर प्रचाराची राळ उठेल. यावेळी विविध आश्वासनांची खैरात दिली जाणार असली तरी नवी मुंबईत स्वच्छ हवेसाठी कोणीही राजकीय पक्ष गंभीर नसल्याने त्याच्या उपाययोजने बाबत कोणीही ठोस बोलत नाही. त्यामुळे स्वच्छ हवा हा सुद्धा नागरिकांचा हक्क आहे आणि तो हक्क अबाधित राहण्यासाठी कोण प्रयत्न करणार ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
नवी मुंबईत सध्या जल वायू, ध्वनी अशा सर्व प्रकारचे प्रदूषण धोकादायक पातळी ओलांडत असून त्याबाबत फारसे राजकीय पक्ष आणि जनतेलाही माहिती नाही. त्यामुळे निवडणुकीत पार्श्वभूमीवर, शनिवारी वाशी मिनी सी-शोअर वर जनरेशन झेड युवकांनी उभारलेल्या मानवी साखळी करत जनजागृती करण्याचा प्रयत्न केला.वाशी सेक्टर १० ए येथील खाडी किनाऱ्यावर सकाळी ७ वाजल्यापासून जवळपास दोन तास ही शांत मानवी साखळी उभी होती. निवडणूक काळात अल्पकालीन आश्वासनांमुळे आणि पायाभूत सुविधांच्या चर्चेमुळे दुर्लक्षित राहणाऱ्या सार्वजनिक आरोग्याच्या मुद्द्याला पुन्हा केंद्रस्थानी आणण्याचा हा प्रयत्न असल्याचे आयोजकांनी सांगितले.
हवेत प्रदूषण वाढल्याने सध्या “श्वास घेणे आरोग्यास घातक ठरत आहे” आणि “स्वच्छ हवेसाठी मतदान करा” अशा फलकांसह युवकांनी खांद्याला खांदा लावत जो साखळी उभी करण्यात आली होती. त्या द्वारे वाढत्या प्रदूषण संकटाकडे लक्ष वेधले. उर्वरी आणि नॅटकनेक्ट फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात आला असून, हा निषेध नसून नागरिकांच्या सामूहिक चिंतेचा शांत अभिव्यक्ती असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या मानवी साखळीमुळे सकाळी सकाळी व्यायामासाठी आलेले नागरिक, धावपटू आणि ज्येष्ठ नागरिक यांनीही थांबून नेमके काय आहे हे जाणून घेतले.हीच जनजागृती आमचा उद्देश्य असल्याची प्रतिक्रिया आयोजकांनी दिली.
नॅटकनेक्ट फाउंडेशनचे संचालक बी. एन. कुमार यांनी वायुप्रदूषण हा दुय्यम विषय राहता कामा नये, असे ठामपणे सांगितले. “स्वच्छ हवा हा निवडणुकीचा मुद्दा झाला पाहिजे,” असे सांगत त्यांनी मतदारांनी पर्यावरणाबाबत उमेदवारांना थेट प्रश्न विचारावेत, असे आवाहन केले. तसेच शहरी नियोजन संकल्पनेनुसार प्रत्येक नागरिकाला घरातून किमान तीन झाडे दिसली पाहिजेत, ३०० मीटरच्या आत नियमानुसार हिरवाई असावी आणि प्रत्येक परिसरात किमान ३० टक्के जमिनीवर वृक्ष लागवड हवी असे सांगितले.
उर्वरीच्या संचालक वसुधारा गुप्ते यांनी सांगितले की स्वयंसेवक बांधकामधूळ प्रदूषणावर लक्ष ठेवत असून, प्रदूषण नियंत्रण अधिकाऱ्यांना सातत्याने माहिती देत आहेत. जनमत तयार करण्यासाठी स्वाक्षरी मोहिमाही राबवण्यात आली. इंडियन वुमन सायंटिस्ट्स असोसिएशनच्या विनी संधू यांनीही या उपक्रमात सहभाग घेत शहरात हरित क्षेत्र वाढवण्याची गरज व्यक्त केली . धूळ नियंत्रण आणि उत्सर्जन नियमांची काटेकोर अंमलबजावणी गरजेची आहे असे उर्वरीच्या समन्वयक सिया गुप्ता यांनी सांगितले.
