नवी मुंबई : घरातील कौटुंबिक वादातून मुलानेच आईचा गळा आवळून आणि तिचे डोके फरशीवर आपटून हत्या केल्याची धक्कादायक घटना वाशीतील जुहूगावात उघडकीस आली आहे. नंदा रत्नाकर कदम (६५) असे मृत महिलेचे नाव असून, त्यांचा मुलगा महेश रत्नाकर कदम (४२) याच्यावर हत्येचा आरोप आहे. वाशी पोलिसांनी घटनेनंतर काही तासांतच महेशला अटक केली. रविवारी रात्री घडलेल्या या घटनेमुळे जुहूगाव परिसरात खळबळ उडाली आहे.

नंदा कदम या वाशी सेक्टर ११, जुहूगाव येथील अष्टविनायक सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावरील खोली क्रमांक ३०३ मध्ये मुलगा महेश, त्याची पत्नी आणि नातवंडांसह राहत होत्या. घरातील कौटुंबिक कारणांवरून नंदा आणि त्यांच्या सुनेमध्ये वारंवार वाद होत असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. नंदा या आपल्या पत्नीला महत्त्व देत नाहीत, तसेच मुलीलाच अधिक महत्त्व देऊन तिच्या संसाराची काळजी घेतात, असा महेशचा समज होता. या कारणावरून त्याच्या मनात आईबद्दल राग असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

रविवारी सायंकाळी घरात पुन्हा याच कारणावरून वाद झाला. हा वाद वाढल्यानंतर महेशने आईवर हल्ला केल्याचा आरोप आहे. त्याने नंदा यांचा गळा आवळला आणि त्यानंतर त्यांचे डोके फरशीवर आपटले. या हल्ल्यात नंदा यांचा मृत्यू झाला. पोलिसांच्या नोंदीनुसार रविवारी सायंकाळी ६ ते रात्री ९.५० वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली.

घटनेची माहिती मिळताच वाशी पोलिसांचे पथक अष्टविनायक सोसायटीत दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून नंदा कदम यांचा मृतदेह ताब्यात घेतला. घटनास्थळी फॉरेन्सिक पथकानेही भेट देऊन आवश्यक तपासणी केली. त्यानंतर पोलिसांनी महेश कदम याला ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशीनंतर त्याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) कलम १०३(१) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी पहाटे ४.५० वाजण्याच्या सुमारास महेशला अटक करण्यात आली. घटनास्थळाची पाहणी, फॉरेन्सिक तपासणी आणि संबंधित व्यक्तींची चौकशी करून हत्येचा नेमका घटनाक्रम स्पष्ट करण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वाशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चांदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दीपक खरात करीत आहेत.