नवी मुंबई : वाशी सेक्टर १० येथील महापालिकेच्या लॉन टेनिस मैदानाला अवकळा आली आहे. यामुळे क्रीडाप्रेमींमध्ये नाराजी आहे. शहरात खेळाची मैदाने वाचवण्यासाठी आंदोलन सुरू असताना प्रत्यक्षात उपलब्ध असलेल्या मैदानांच्या देखभालीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे.
मिनी सीशोरसमोरील या प्रशस्त मैदानावर दररोज सकाळी लॉन टेनिस, बॅडमिंटन तसेच योग वर्ग घेतले जातात.
मात्र मैदानाच्या कुंपणावर वाढलेल्या वेली, तुटलेले तारकंपाउंड आणि अस्वच्छ परिसर यामुळे देखभालीचा अभाव स्पष्ट होतो. याच ठिकाणी महापालिकेने उभारलेले टेबल टेनिस व स्नूकर कोर्ट सध्या वापरात नसल्याची स्थिती आहे.माजी नगरसेवक अविनाश लाड आणि स्थानिक क्रीडाप्रेमी यांच्या प्रयत्नातून या ठिकाणी क्रीडा सुविधा उभारण्यात आल्या होत्या. कोट्यवधी रुपये खर्च करून सुविधा निर्माण केल्यानंतर त्यांची नियमित देखभाल न केल्याची टीका नागरिकांकडून होत आहे.
दरम्यान, शहरातील इतर मैदानांच्या वापराबाबतही वाद निर्माण झाले आहेत. बेलापूर येथील मैदान सुपर स्पेशालिटी शासकीय रुग्णालयासाठी देण्याच्या निर्णयाविरोधात आंदोलन झाले. खेळासाठी स्वतंत्र जागा राखीव ठेवावी, अशी मागणी विविध क्रीडा संघटनांनी केली आहे. शहराची ‘फुफ्फुसे’ मानल्या जाणाऱ्या मैदानांच्या देखभालीसाठी उद्यान, क्रीडा आणि शहर अभियंता विभागांमध्ये प्रभावी समन्वय आवश्यक असल्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
कोट –
वाशी येथील लॉन टेनिस मैदानात असलेल्या क्रीडा व्यवस्थेबाबत पाहणी करून योग्य ती सुधारणा करण्यात येतील. या ठिकाणी नवी मुंबईतील अतिशय चांगले असे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारण्याचे प्रस्तावित आहे. – अभिलाषा म्हात्रे, उपायुक्त, क्रीडा विभाग
कोट –
नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून या मैदानाबाबत योग्य ती व्यवस्था व काळजी घेण्याबाबत पालिकेकडे पाठपुरावा करण्यात येईल. या ठिकाणी चांगले खेळाची व्यवस्था निर्माण करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असून क्रीडा विभागामार्फत योग्य व्यवस्था ठेवण्यासाठी प्रयत्न केला जाईल.
- सोनवी लाड, नगरसेविका, क्रीडा समिती सदस्य

