नवी मुंबई : वाशी येथील मिनी सी-शोर परिसरात शनिवारी पहाटेच्या सुमारास १९ वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सुजलकुमार महातो असे मृत तरुणाचे नाव असून, तो कोपरखैरणे येथील एका चायनीज हॉटेलमध्ये काम करत होता. पहाटे चारच्या सुमारास त्याच्यावर हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती असून, हल्ल्यानंतर आरोपी पसार झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुजलकुमार पहाटेच्या सुमारास वाशीतील मिनी सी-शोर परिसरात असताना अज्ञात व्यक्तीने त्याच्यावर हल्ला केला. आरोपीने त्याच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार केल्याची प्राथमिक माहिती आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सुजलकुमारचा मृत्यू झाला. हल्ल्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
घटनेची माहिती मिळताच वाशी पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. गुन्हे शाखेचे अधिकारी तसेच फॉरेन्सिक पथकानेही घटनास्थळी पाहणी करून पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली आहे. परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले जात असून, हल्लेखोराची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत.
सुजलकुमारवर हल्ला करण्यामागे वैयक्तिक वाद, पैशांचा व्यवहार अथवा अन्य कोणते कारण होते का, याचा तपास पोलीस करीत आहेत. मृत तरुणाच्या परिचितांकडे तसेच तो काम करीत असलेल्या ठिकाणीही चौकशी केली जात आहे.
दरम्यान, धारदार शस्त्राने झालेल्या या हत्येमुळे नवी मुंबईत पुन्हा ‘कोयता गँग’चा वावर वाढला आहे का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मात्र, या घटनेत कोणत्याही संघटित टोळीचा सहभाग असल्याची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही. आरोपीला अटक झाल्यानंतरच हत्येमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
