नवी मुंबई : वाशी येथील ग्राहक सहकारी संस्थेमार्फत पुरवली जाणारी घरगुती गॅस सिलिंडर सेवा बंद करण्याच्या संभाव्य हालचालींमुळे नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली असून, उपमहापौर दशरथ भगत यांनी सेवा अखंड सुरू ठेवण्याची विनंती वजा मागणी केली आहे. ४ एप्रिल २०२६ रोजी संस्थेला पाठवलेल्या पत्राद्वारे त्यांनी गॅस पुरवठा हा “जनहक्काचा” विषय असल्याचे अधोरेखित केले आहे.

वाशी सेक्टर ५ मधील एचपी गॅस डीलर असलेल्या संस्थेने अनेक वर्षे अखंड व सुलभ सेवा दिल्याबद्दल नागरिकांच्या वतीने समाधान व्यक्त करतानाच, सध्याच्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा परिणाम घरगुती गॅस पुरवठ्यावर होत असल्याने ही बाब अधिक संवेदनशील ठरत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. त्यामुळे सेवा “आपत्कालीन स्वरूपात” सुरू ठेवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे.

संबंधित संस्था ही सार्वजनिक सेवा पुरवणारी सहकारी संस्था असल्याने ग्राहकहिताला बाधा येणार नाही, याची दक्षता घेण्याचे आवाहन निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आले आहे. संचालक हे संस्थेचे विश्वस्त असल्याने, कोणताही निर्णय घेताना ग्राहकांच्या हिताचा विचार करणे आवश्यक असल्याचेही भगत यांनी नमूद केले आहे.

गॅस सिलिंडर सेवा पूर्णपणे बंद होईपर्यंत अखंड पुरवठा सुरू ठेवावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. गावठाण विस्तार योजनेअंतर्गत काही भागात पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठा सुरू असला, तरी उर्वरित भागात सेवा उपलब्ध होईपर्यंत सिलिंडर पुरवठा सुरू ठेवण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली आहे. विशेषतः मूळ गावठाण भागात सुरक्षेच्या कारणास्तव पाईपलाईनऐवजी सिलिंडरद्वारेच पुरवठा सुरू ठेवावा, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

संस्था बंद करण्याचा कोणताही निर्णय घेण्यापूर्वी नोंदणीकृत ग्राहकांना लेखी नोटीस देऊन त्यांची मते जाणून घेणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. तसेच संस्थेचे बायलॉज आणि सिडको भूखंड कराराची माहिती ग्राहकांना उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, या पत्राची प्रत सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक, ठाणे येथील उपनिबंधक तसेच एचपीसीएलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवण्यात आली आहे.

सेवा बंद झाल्यास कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न

आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे आधीच घरगुती गॅस पुरवठ्यावर ताण निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत वाशीतील गॅस वितरण सेवा बंद झाल्यास नागरिकांमध्ये असंतोष वाढून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी भीती यानिमित्ताने नवी मुंबईचे उपमहापौर दशरथ भगत यांच्याकडून व्यक्त करण्यात आली आहे.