नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या वाशी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णाला मुदतबाह्य सलाईन चढविल्याने त्याची प्रकृती खालावल्याचा गंभीर आरोप नातेवाईकांनी केला आहे. प्रकृती बिघडल्यानंतर रुग्णाला पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलविण्यात आले असून, सध्या त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या प्रकाराला जबाबदार असलेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी रुग्णाच्या नातेवाईकांसह बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी वाशी रुग्णालयात ठिय्या आंदोलन केले.

गोपीराम खडसे (५०) यांना ३१ ऑगस्ट रोजी ताप आणि चक्कर येत असल्याने वाशी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्राथमिक उपचारानंतर त्यांना वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले. १ सप्टेंबर रोजी सकाळपासून दुपारपर्यंत त्यांची प्रकृती स्थिर होती. मात्र, त्यानंतर प्रकृती अचानक खालावल्याने त्यांना पुढील उपचारासाठी हिरानंदानी (फोर्टीस) रुग्णालयात हलविण्यात आले.

दरम्यान, उपचारादरम्यान खडसे यांना मुदत संपलेली सलाईन लावण्यात आल्याचे नंतर निदर्शनास आले, असा दावा त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. सलाईन चढवल्यानंतर त्यांची प्रकृती बिघडत गेली आणि अखेर त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करावे लागले, असा आरोप नातेवाईकांनी केला. रुग्णालयातील संबंधित डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांकडे वारंवार तक्रार करूनही वेळीच दखल घेतली नसल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर नातेवाईक आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते रुग्णालयात दाखल झाले. मुदतबाह्य सलाईन लावणाऱ्या संबंधित व्यक्तीवर तातडीने कारवाई करावी, तसेच रुग्णाच्या उपचाराची जबाबदारी महापालिका प्रशासनाने घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

चौकशी करून कारवाईचे प्रशासनाचे आश्वासन

वाशी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. रवींद्र म्हात्रे यांनी रुग्णाला ३१ ऑगस्ट रोजी ताप आणि चक्कर येत असल्याने दाखल करण्यात आल्याचे सांगितले. दुसऱ्या दिवशी दुपारनंतर प्रकृती खालावल्याने त्यांना पुढील उपचारासाठी हिरानंदानी (फोर्टीस) रुग्णालयात महापालिकेच्या कोट्यातून हलविण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुदतबाह्य सलाईन लावल्याबाबत नातेवाईकांनी तक्रार केली असून, त्यानुसार चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही याबाबत माहिती देण्यात आल्याचे डॉ. म्हात्रे यांनी सांगितले.

नवी मुंबई महापालिकेच्या आरोग्य समितीचे सभापती डॉ. जयाजी नाथ यांनी मिळालेल्या माहितीनुसार, रुग्णाला डेंग्यूची लागण झाल्याचे सांगितले. त्याच्या रक्तातील प्लेटलेट्सची संख्या सुमारे ४० हजारांपर्यंत घटली असून, त्यामुळेही प्रकृती गंभीर झाल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. सलाईन लावल्यानंतर तत्काळ त्रास झालेला नसल्याने प्रकृती खालावण्याचे कारण केवळ मुदतबाह्य सलाईनच आहे, असे सध्या ठामपणे सांगता येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मात्र, मुदतबाह्य सलाईन किंवा कोणतेही औषध रुग्णाला देणे ही गंभीर निष्काळजीपणाची बाब आहे. सलाईन कशी आणि कोणाच्या निष्काळजीपणामुळे लावण्यात आली, याची चौकशी केली जाईल आणि दोषी आढळणाऱ्यावर कारवाई करण्यात येईल, असे डॉ. नाथ यांनी सांगितले.

एकात्मिक आरोग्य धोरणाच्या मंजुरीनंतरचा प्रकार

एकीकडे नवी मुंबई महापालिकेने शहरातील आरोग्यव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी एकात्मिक आरोग्य सुविधा व व्यवस्थापन धोरण राबविण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. महापालिका रुग्णालयांमधील आरोग्यसेवा अधिक सक्षम करण्याचा दावा होत असतानाच, या प्रास्तावाच्या दुसऱ्याच दिवशी वाशी मनपा रुग्णालयात मुदतबाह्य सलाईन रुग्णाला लावल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे महापालिका रुग्णालयांमधील औषधसाठा व्यवस्थापन, औषधांची मुदत तपासण्याची प्रक्रिया आणि रुग्णांच्या उपचारातील देखरेख याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एकात्मिक आरोग्य धोरणाच्या अंमलबजावणीपूर्वीच रुग्णालयातील मूलभूत प्रक्रियांमध्ये त्रुटी राहणार नाहीत, याची खात्री महापालिका आणि प्रशासन कशी करणार, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.