नवी मुंबई : वाशी येथील नवी मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात मुदतबाह्य सलाईन चढविण्यात आल्याच्या धक्कादायक प्रकारानंतर उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या ५० वर्षीय रुग्णाचा गुरुवारी सकाळी मृत्यू झाला. गोपीराम खडसे असे मृत रुग्णाचे नाव आहे. या घटनेनंतर रुग्णाचे नातेवाईक आणि हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या असून, संबंधित डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
खडसे यांच्यावर वाशी मनपा रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांना मुदतबाह्य सलाईन चढविण्यात आल्याचा आरोप आहे. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान गुरुवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे मुदतबाह्य सलाईनच्या घटनेचा आणि रुग्णाच्या मृत्यूचा संबंध आहे का, याची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.
या प्रकाराची माहिती समोर आल्यानंतर बुधवारी रुग्णाच्या नातेवाईकांसह हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी वाशी मनपा रुग्णालयाबाहेर आंदोलन केले. रुग्णालयातील निष्काळजीपणाला जबाबदार असलेल्या डॉक्टर आणि परिचारिका तसेच संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली. रुग्णाच्या मृत्यूनंतर गुरुवारीही रुग्णालयाबाहेरील वातावरण तणावपूर्ण असून, नातेवाईक आणि कार्यकर्ते कारवाईच्या मागणीवर ठाम आहेत.
दरम्यान, या प्रकरणी महापालिकेचे मुख्य आरोग्य अधिकारी राजेश म्हात्रे यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित दोन परिचारिकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे. मात्र, या घटनेत आणखी कोणाची जबाबदारी निश्चित होते आणि संबंधित डॉक्टर किंवा इतर कर्मचाऱ्यांवर कोणती कारवाई केली जाणार, याकडे आता लक्ष लागले आहे.
वाशी मनपा रुग्णालयात यापूर्वी गर्भवती महिलेच्या मृत्यूची घटना घडली होती. त्यानंतर आता मुदतबाह्य सलाईनचा प्रकार आणि त्यात रुग्णाचा झालेला मृत्यू यामुळे महापालिकेच्या रुग्णालयांमधील उपचार व्यवस्था आणि रुग्णांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
