नवी मुंबई : वाशी रेल्वे स्थानकात रात्रीच्या वेळी रेल्वे स्थानक परिसर आणि फलाटावर बेघरांचा आश्रय वाढला आहे. करोनाकाळात प्रवाशांची रहदारी कमी होती, मात्र आता ती वाढली आहे. रात्रीच्या वेळी रेल्वे स्थानक परिसर महिला प्रवाशांकरिता असुरक्षित ठरत आहे. दरम्यान, रेल्वे पोलिसांकडून कोणतीही प्रतिबंधात्मक कारवाई होताना दिसत नाही.

करोनाकाळात नवी मुंबई शहरातील रेल्वे स्थानकात आणि परिसरात भिकारी, बेघर यांनी आपले संसार थाटले आहेत. मात्र करोना नियम शिथिल झाल्यानंतर स्थानक परिसरात प्रवाशांची गर्दी वाढली आहे. वाशी रेल्वे स्थानकात रात्री ९ ते १० वाजले की फलाट आणि तिकीट खडकीजवळ बेघर आपले बस्तान मांडतात. त्याच ठिकाणी जेवण करून अस्वच्छता करतात. फलाटावरसुद्धा अंथरूण टाकून झोपलेल्याचे दृश्य पाहावयास मिळते. दरम्यान, आधुनिक काळात नोकरदार महिलांना रात्री उशिरा प्रवास करावा लागतो. रेल्वे डब्यांमध्ये महिलांना सुरक्षा पुरवली जाते, मात्र रेल्वे स्थानक परिसर आणि फलाटावर ती नसल्याने असुरक्षेचे वातावरण असते. रात्रीचा प्रवास करणाऱ्या महिलांना मद्यपी व गर्दुल्ले यांच्याकडून त्रास होत असतो. याबाबत अनेकदा वेळेअभावी प्रत्यक्ष तक्रार होत नसल्याने रेल्वे पोलीस कारवाई करण्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे प्रवाशांकडून बोलले जात आहे. डोळ्यादेखत हे प्रकार सुरू असल्याने कारवाईची मागणी होत आहे.

कामावरून सुटल्यानंतर घरी परतत असताना रात्रीच्या वेळी वाशी रेल्वे स्थानक परिसर आणि फलाटावर बेघरांचा वावर वाढला आहे. त्यामुळे येथून जाताना असुरक्षित असल्याची भीती उत्पन्न होत आहे.

– सविता बोबडे, प्रवासी महिला