मुदत संपूनही गटारांचे काम अपूर्ण; ‘खुर्ची पळवा आंदोलना’चा मनसेचा इशारा

शीव-पनवेल महामार्गावरील वाशी गाव आणि सेक्टर परिसराला जोडणाऱ्या भुयारी मार्गात गटारे बांधण्याचे काम अद्याप पूर्ण करण्यात आलेले नाही. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही या मार्गात पाणी साचून तो बंद पडण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे तीन दिवसांत गटारांचे काम पूर्ण न केल्यास वर्षांनुवर्षे खुर्चीला चिकटून

बसलेल्या अधिकाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी ‘खुर्ची पळवा आंदोलन’ करण्यात येईल, असा इशारा मनसेने दिला आहे.

वाशी गाव भुयारी मार्गात दर पावसाळ्यात पाणी साचून वाहने अडकून पडतात आणि हा मार्ग पडतो. ही समस्या सोडवण्यासाठी महापालिकेने यंदा १८ मे ते ५ जून या कालावधीत येथे गटारे बांधण्याचे काम हाती घेतले होते. मात्र पावसाळा सुरू झाला, तरी या भुयारी मार्गाचे काम पूर्ण झालेले नाही. पालिका प्रशासनाच्या या ढिसाळ कारभारामुळे स्थानिक ग्रामस्थ आणि वाहनचालक संतापले आहेत. त्यामुळे ‘खुर्ची पळवा आंदोलन’ करण्याचा इशारा मनसेचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष गजानन काळे यांनी दिला आहे.

शीव-पनवेल महामार्गावरील वाशी रेल्वे स्थानक आणि वाशी गावातील नागरिकांना सेक्टर आणि वाशी रुग्णालय व इतर ठिकाणी जाण्यासाठी वाशी वाहतूक पोलीस चौकी उड्डाण पुलाखालून जावे लागत असे. या वाहनांसाठी महापालिकेने भुयारी मार्ग उभारला. या भुयारी मार्गात नेहमीच अंधार असतो. त्यामुळे पादचारी शीव-पनवेल महामार्ग ओलांडून ये-जा करणे पसंत करतात. भुयारी मार्गात गटार बांधण्यासाठी १८ मे ते ५ जून या कालावधीत हा मार्ग बंद करण्यात आला होता. महानगरपालिकने भुयारी मार्गातील जाळ्या काढून बंदिस्त गटाराचे काम या ठिकाणी केले आहे. तर भुयारी मार्गाच्या प्रवेशद्वारावरील गटाराचे काम व जोड रस्त्याचे काम अद्याप अर्धवट आहे. कामाची मुदत ५ जूनपर्यंत असल्याचा फलक देखील लावण्यात आला आहे. मात्र महापालिकेला आपल्या कामाचा व दिलेल्या आश्वासनाचा विसर पडला आहे. प्रवाशांना नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशन येथील भुयारी मार्गाचा वापर करून नियोजित ठिकाणी जावे लागत आहे.

भुयारी मार्गातील गटाराचे काम पूर्ण होत आले आहे. मात्र पहिल्याच पावसात पाणी साचल्याने राहिलेले काम पूर्ण करत आहोत.

महेंद्रसिग ठोके, वाशी विभाग अधिकारी