रस्ता अडवल्यामुळे वाहनचालक त्रस्त; भाजीपाल्यामुळे रस्त्यावर कचऱ्याचे ढीग

नवी मुंबई : नवी मुंबई शहरात पालिकेच्या वतीने सर्वत्र स्वच्छता ठेवण्यासाठी विविध स्तरांवर साफसफाई केली जात आहे. सानपाडा रेल्वे स्थानकाबाहेर ओरिएन्टल महाविद्यालयाच्या येथील रस्त्यावरच भाजीपाल्याची मंडई वसवली आहे. त्यामुळे अध्र्याहून अधिक रस्ता अडवला जात असून त्यामुळे वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

मुख्य रस्त्यावर मात्र पदपथावरील फेरीवाल्यामुळे अस्वच्छता पसरत असून कचऱ्याचे ढीग साचलेले पाहावयास मिळत आहेत. मुख्य रस्त्यालगत असलेल्या पदपथावर रस्त्यातच दुतर्फा अनधिकृत फेरीवाले आपले बस्तान मांडून विक्री करीत आहेत. त्यामुळे वाहनचालकांना वाहने चालवणे जिकिरीचे होत आहेत. हे फेरीवाले बसल्या जागीच दिवसभरात उरलेला, खराब भाजीपाला, पालापाचोळा, फळे, प्लास्टिक पिशवी कचरा रस्त्यावरच फेकून कचऱ्याचे ढीग लावत आहेत. फेरीवाले आणि रस्त्यावर केलेला कचरा यांमुळे नागरिकांना मात्र चालताना, रहदारी करण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

महापालिका प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी नेहमीच कारवाई करण्यात येते. आता पुन्हा कारवाई करून रस्ता स्वच्छ ठेवला जाईल.

– सुबोध ठाणेकर, विभाग अधिकारी, तुर्भे