कोबी, फ्लॉवर ७ ते १२ रुपये किलो

गुजरातचा निवडणुकीचा रणसंग्राम संपल्यानंतर मोठय़ा प्रमाणात सुरू झालेली कोबी, फ्लॉवरची आवक आणि भाजी बाजारातील चलनी नाणे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाटाण्याची घाऊक बाजारातील मुसंडी यामुळे मागील महिन्यात गगनाला भिडलेले भाज्यांचे दर कमी झाले आहेत. गेले दोन दिवस भाज्यांच्या घाऊक बाजारात ६०० ते ६५० ट्रक भरून विविध प्रकारच्या भाज्या येऊ लागल्याने घाऊक बाजारातच भाज्या स्वस्त झालेल्या आहेत. त्याचा परिणाम किरकोळ बाजारात काही प्रमाणात दिसून येत आहे. कोबी, फ्लॉवर या सर्वाधिक मागणी असलेल्या भाज्यांची किंमत सरासरी सात ते बारा रुपये प्रति किलो आहे.

परतीचा मुसळधार पाऊस आणि अधूनमधून पडणारा अवकाळी पाऊस यामुळे तयार झालेल्या भाज्यांच्या मळ्यावर पाणी फेरले गेले होते. त्यात ओखीमुळे पडलेल्या पावसानेही राज्यातील शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्याचे चित्र होते. सर्वसाधारणपणे डिसेंबरच्या पहिल्या आठवडय़ात देशातील विविध राज्यांतून अतिरिक्त भाज्या मुंबईच्या बाजारात दाखल होतात. यात गुजरातमधून येणारी कोबी, फ्लॉवर, राजस्थानमधील गाजर आणि मध्य प्रदेश, पंजाबमधील वाटाण्याचा मोठा वाटा आहे. परराज्यातील या भाज्यांबरोबरच उत्तर, पश्चिम महाराष्ट्रातून येणारा टोमॅटो, पालेभाज्यांचे हिवाळ्यामुळे प्रमाण वाढले आहे. मागील महिन्यात टोमॅटोवर संक्रांत ओढावल्याने आणि भाज्यांची आवक घटल्याने किमती वाढल्या होत्या. त्यामुळे ऐन सणासुदीत चढय़ा दरात भाज्या विकत घेण्याची वेळ ग्राहकांवर आली होती, मात्र मागील आठवडय़ापासून मुंबईच्या घाऊक बाजारात कोबी, फ्लॉवर, वाटाणा, गाजर, टोमॅटो या प्रमुख भाज्यांची आवक वाढली असून पश्चिम व उत्तर महाराष्ट्रातून मोठय़ा प्रमाणात येणाऱ्या मेथी, कांद्याची पात, कोथिंबीर, मुळा, पालक या पालेभाज्यांचीही आवक वाढल्याने त्यांच्या किमती घटल्याची माहिती , व्यापाऱ्यांनी दिली आहे.

ओखी वादळाचा फटका गुजरात व राज्यातील काही शेतकऱ्यांना बसला पण तो फार मोठा नाही. सर्वसाधारणपणे डिसेंबरच्या पहिल्या आठवडय़ात परराज्यांतून येणाऱ्या भाज्यांचे प्रमाण वाढल्याने घाऊक बाजारात स्वस्ताई आली आहे. किरकोळ बाजारातही ही स्वस्ताई दिसून यावी अशी अपेक्षा आहे.

शंकर पिंगळे, माजी संचालक, घाऊक भाजी बाजार, एपीएमसी

कांदा आवाक्यात येणार

डिसेंबर, जानेवारीपासून नवीन कांद्याची आवक सुरू होऊन दरात घसरण होते. मात्र, यंदा पावसाने पिकाची नासाडी झाली. त्यामुळे हंगाम लांबला. कांद्याला उभारी येत असून नवीन कांदा अधिक प्रमाणात येण्यासाठी १५ दिवस लागणार असल्याचे कांदा व्यापारी अशोक वाळुंज यांनी सांगितले. घाऊकमध्ये ३२ ते ३६ रुपयांवर असलेला कांदा आता २५ ते ३० रुपयांवर आलेला आहे. १५ दिवसांनी हेच दर २० ते २५ रुपयांवर येण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली.

किरकोळीतही दर घटले

* वातावरणातील बदल, पाऊस यामुळे गेल्या काही दिवसांत घाऊक बाजारात भाज्यांच्या दरांत बरेच चढउतार झाले असले, तरी किरकोळ बाजारात मात्र स्थिती जैसे थेच होती. आता मात्र किरकोळीतही स्वस्त भाज्या उपलब्ध झाल्या असून त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

* घाऊक बाजारात ४० रुपये प्रति किलो असणाऱ्या फ्लॉवरने किरकोळीत शंभरी पार केली होती. घाऊकमध्येच भाजी महाग मिळत असल्याचे कारण किरकोळ व्यापारी पुढे करीत होते. मोठय़ा कालावधीत नंतर किरकोळ बाजाराने ग्राहकांना दिलास दिला आहे.

* घाऊक बाजारात आवक वाढल्याने सध्या वाटाणा, वांगी, कोबी, फ्लॉवर स्वस्तात उपलब्ध आहेत. गेल्या आठवडय़ात ६० ते ८० रुपये किलोवर असलेल्या वांगी, कोबी, फ्लॉवर या भाज्या ४० रुपयांना उपलब्ध आहेत. टोमॅटोच्या दरातही घसरण झाली असून आता ते ३० ते ३५ रुपयांवर आले आहेत.