नवी मुंबई: कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजी बाजारामध्ये राहणाऱ्या एका व्यापाऱ्याची हत्या झाल्याचे रविवारी समोर आले आहे. त्याच्या डोक्यात तीक्ष्ण हत्याराने वार केल्याचे तपासात समोर आले असून याप्रकरणी एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रमायण ललसा ऊर्फ गुरदेव ऊर्फ बाबा असे मयत व्यक्तीचे नाव आहे. भाजी मार्केटमधील गाळा क्रमांक ५५१ ‘डी’ या ठिकाणी त्यांची हत्या करण्यात आली. या गाळ्याचे मालक लालजी वैश्य हे असून त्यांनी हा गाळा संजय गुप्ता आणि मयत रमायण यांना भाडेतत्त्वावर दिला आहे. संजय गुप्ता हे भाजी विक्री तर रमायण हे काकडी, गाजर, बीटची विक्री करतात. यातील रमायण हे याच गाळ्यात पहिल्या माळ्यावर राहात होते. १४ ऑगस्टला नेहमीप्रमाणे भाजी विक्रीसाठी संजय गुप्ता आले. मात्र, रमायण हे आले नसल्याने त्याबाबत संजय गुप्ता यांनी गाळा मालक लालजी यांना कळवले. रमायण हे राहात असलेल्या ठिकाणी बाहेरून कुलूप लावण्यात आले होते.

अन्यत्र शोध घेऊनही त्यांचा थांगपत्ता लागत नसल्याने पोलिसांना याबाबत कळवल्यावर पोलिसांनी रमायण राहात असलेल्या खोलीत खिडकीतून पाहिले असता ते रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसून आले. पोलिसांनी कुलूप तोडून आत प्रवेश करून रमायण यांना रुग्णालयात दाखल केले तेथे डोक्याच्या मागे तीक्ष्ण हत्याराने वार केल्याने झालेल्या रक्तस्रावाने त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी आपल्या अहवालात स्पष्ट केले. याबाबत एपीएमसी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा शोध घेण्यात येत आहे.