scorecardresearch

नवी मुंबई: गाड्यांच्या चाकांच्या चोरीने वाहनचालक हैराण, भंगार चोरी करणारी टोळी कार्यरत असल्याचा संशय

नवी मुंबईत आठवड्यात किमान गाडीची चाके चोरी झाल्याचा गुन्हा दाखल होत आहे

crime news
(फोटो सौजन्य- प्रातिनिधिक छायाचित्र, लोकसत्ता)

नवी मुंबई : नवी मुंबईत पार्किंगची समस्या मोठी असून रात्रीच्या वेळी सर्वत्र रस्त्याच्या दोन्ही बाजूला चारचाकी गाड्या ओळीने पार्क केलेल्या दिसून येतात. याचा गैरफायदा रात्रभर बेवारस असणाऱ्या गाड्यांची चाके चोरी करणारे चोर घेत असल्याने सुरक्षित गाडी कोठे पार्क करावी असा प्रश्न गाडी मालकांना पडला आहे.

नवी मुंबईत आठवड्यात किमान गाडीची चाके चोरी झाल्याचा गुन्हा दाखल होत आहे. हि चोरी काही लाखोंची होत नसल्याने त्या कडे पोलीस प्रशासन हि गांभीर्याने पाहत नसल्याचा आरोप गाडी मालकांच्या कडून केला जातो. मात्र घाईने कामावर जाताना अचानक गाडीची चाके चोरीला गेल्याचे लक्षात आल्यावर काय मानसिक अवस्था होते याचे गांभीर्य केवळ ज्याच्या गाडीची चाके चोरीला गेली त्यांनाच असते. रिक्षांचे चाके चोरीला जाण्याचे प्रमाण अधिक आहे. अनेकदा पोलिसांचा सरेमिरा नको पूर्ण दिवस गुन्हा नोंदवण्यास जातो त्यामुळे भाडे बुडते आदी कारणांनी अनेक जण तक्रार देत नाहीत. त्या ऐवजी हजार दिड हजार रुपयात सेकंड हॅन्ड चाक विकत घेतले जातात. अशी माहिती शब्बीर शेख या रिक्षा चालकाने दिली.

आणखी वाचा- नवी मुंबई: नियोजित शहरात ‘वॉकेबिलिटी’ योजनेचे तीनतेरा

तुर्भे इंदिरानगर येथे राहणारे रुपेश मिश्रा हे ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करतात. त्यांनी त्यांची इको गाडी १५ जानेवारीला एवरेस्ट निवारा समोरील इंदिरा सर्कल येथील मोकळ्या जागेत गाडी पार्क केली. ते आजारी पडल्याने त्यांना बिहार येथील मूळ गावी घेऊन गेले. तब्येत बरी झाल्यावर जेव्हा पुन्हा नवी मुंबईत ते आले. आणि नियमित काम सुरु केल्यावर कामावर जाण्यासाठी गाडीत बसले असता स्टेअरिंग एकदम हलके झाल्याचे त्यांना जाणवले. म्हणून त्यांनी खाली उतरून पहिले असता त्यांच्या गाडीचे पुढील दोन आणि मागील एक चाक (टायर आणि रिम सह) नसल्याचे लक्षात आले. विशेष म्हणजे त्या ऐवजी चाकाच्या उंची एवढे दगड लावण्यात आले असल्याचे निदर्शनास आले. या बाबत त्यांनी तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाण्यात शनिवारी गुन्हा नोंद केला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

गाडीच्या चाकांच्या चोरीच्या घटनात वाढ होत असल्या बाबत पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांना विचारणा केली असता भंगारवाल्यांवर त्यांनी संशय व्यक्त करीत पोलीस त्यांचा तपास करीत असल्याचे सांगितले. यापूर्वीही चाके चोरणारी टोळी पकडली असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच ज्या ठिकाणी सीसीटीव्ही आहे वा सुरक्षित पार्किंग आहे अशाच ठिकाणी गाडी पार्क करावी. पार्किंग बाबत नियमांचे उलंघन करू नये असे आवाहन त्यांनी केले.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 13-03-2023 at 13:44 IST