उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नवी मुंबई उपप्रादेशिक कार्यालयाचा निर्णय, वाहनचालक त्रस्त

नवी मुंबईतील उपप्रादेशिक परिवहन विभागात वाहनचालकांच्या योग्यता प्रमाणपत्राचे नूतनीकरण बंद झाले आहे. पासिंग ट्रॅक उपलब्ध नसल्याने उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हे नूतनीकरण बंद झाले आहे.

नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातून (आरटीओ) दिवसाला १५० वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्रांची चाचणी करण्यात येते. यामधून आरटीओला दिवसाला १ लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. मात्र मंगळवारपासून योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण बंद करण्यात आले आहे. वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्रांसाठी एकाच दिवशी जास्त वाहने येत असल्यामुळे वाहनचालकांना ‘टोकन’ देण्यात येते. ‘टोकन’वर नमूद केलेल्या दिवसानुसार वाहनचालकांना यावे लागते. दरम्यान नवी मुंबईतील आरटीओकडून ३१ जानेवारीपर्यंतचे टोकन देण्यात आले होते. उच्च न्यायालयाने नवी मुंबई आरटीओकडे २५० चा असणारा पासिंग ट्रॅक उपलब्ध नसल्याने योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण बंद करण्याचे आदेश दिले आहेत. दिवसाला नवी मुंबई आरटीओत ६६ अवजड वाहने, ४० रिक्षा, तर ४० टेम्पो योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणसाठी येत असतात. पण उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार योग्यता नूतनीकरण बंद करण्यात आल्यामुळे वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अनेक दलालही यामुळे त्रस्त झाले आहेत. ज्या वाहनचालकांना योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणांची आवश्यकता असेल, त्या वाहनचालकांना दुसऱ्या आरटीओ कार्यालयतून वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी नवी मुंबई आरटीओतून शिफारस करण्यात येते. ज्या वाहनचालकांनी योग्यता नूतनीकरण प्रमाणपत्र नूतनीकरण करून घेतले नाही, त्यांच्यावर आरटीओकडून कारवाई करण्यात येते. अशा वाहनचालकांकडून ४ हजार रुपयांचा दंड आकारण्यात येतो.

प्रमाणपत्रासाठी शिफारस

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण बंद केले आहे. न्यायालयाच्या पुढील आदेशानंतर योग्यता प्रमाणपत्र देणे सुरू करण्यात येईल. नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे ‘पासिंग ट्रॅक’ नसल्यामुळे अडचण उद्भवली आहे. पण ज्या वाहनचालकांना योग्यता प्रमाणपत्रांची आवश्यकता आहे, त्यांना दुसऱ्या आरटीओ कार्यालयातून पासिंग करून घेण्यासाठी शिफारसपत्र देण्यात येते. अशी माहिती, साहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र सावंत यांनी दिली.