नवी मुंबई : ज्वालाग्राही पदार्थाचे वहन करणारी वाहने नागरी वस्तीत उभ्या करण्यास बंदी असताना सध्या घणसोली रेल्वे स्टेशन ते घणसोली गाव या दरम्यान गेल्या काही दिवसांपासून ती उभी आहेत. पंधरापेक्षा अधिक वाहने असून यामुळे या परिसराला धोका निर्माण झाला आहे.
विशेष म्हणजे याबाबत वाहतूक पोलीस, अग्निशमन विभाग वा उपप्रादेशिक कार्यालयाने अनभिज्ञ आहेत. याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
नवी मुंबईलगत असणाऱ्या आद्योगिक वसाहतीत पूर्वीपेक्षा रासायनिक कारखाने आता कमी झाले असले तरी अद्याप काही कारखाने कार्यरत आहेत. तसेच उरण येथील ओएनजीसी हा मोठा प्रकल्प आहे. त्यामुळे शहरातून इंधन वा तत्सम ज्वालाग्राही पदार्थाचे वहन करणारे वाहने रस्त्यावर दिसत असतात. मोठय़ा प्रमाणात गुजरात, नाशिक, मनमाड या परिसरांतून ये-जा करीत असतात.
मात्र या वाहतुकीसाठी व या वाहनांच्या पार्किंगबाबत कडक नियमावली असून त्याचे काटेकोर पालन करावे लागते. नागरी वस्तीत, गर्दीच्या ठिकाणी ही वाहने उभी करता येत नाहीत. असे असताना घणसोलीत रस्त्यालगत पंधरापेक्षा अधिक वाहने उभी आहेत.वाहतूक विभाग, अग्निशमन वा उपप्रादेशिक कार्यालयालाही ही वाहने दिसू नयेत ही बाब गंभीर असल्याचे येथील रहिवासी अनंत गोळे यांनी सांगितले.
या वाहनांबाबत चालकांकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी माहिती देण्यास नकार दिला. ज्वालाग्राही पदार्थ आहेत की ती रिकामी आहेत, याबाबत बोलण्यास नकार दिला.


बेकायदा पार्किंग हा विषय परिवहन विभागाचा नाही. मात्र सदर ज्वालाग्राही ट्रक परवाना वा आमच्या विभागाशी निगडित काही त्रुटी असेल तर निश्चित तातडीने तपासणी करण्यात येईल. – हेमांगी पाटील, उप्रादेशिक परिवहन अधिकारी

दुर्घटना होऊ नये याची काळजी घेणे आवश्यक आहे. तसा असा प्रकार आढळून आला तर कारवाई केली जाईल. याबाबत तपासणी केली जाईल. – पुरुषोत्तम जाधव, अग्निशमन मुख्य अधिकारी, महापालिका

या वाहनांच्या बेकायदेशीर पार्किंगबाबत त्वरित कारवाई केली जाईल. ज्वालाग्राही पदार्थ वहन करणारी वाहने ठराविक अंतरावर आणि नागरी वस्तीपासून दूर पार्क करणे आवश्यक आहे. याबाबत तात्काळ पाहणी करून योग्य ती कारवाई केली जाईल. – पुरुषोत्तम कराड, पोलीस उपायुक्त, वाहतूक विभाग