नवी मुंबई : नाशिक येथील आयटी क्षेत्रातील महिलांवरील अत्याचाराच्या घटनेनंतर देशभरातील कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये अचानक तपासणी (इन्स्पेक्शन) मोहीम राबविण्याचा इशारा राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी दिला. महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कठोर पावले उचलली जाणार असून संबंधित प्रकरणाचा सर्वंकष तपास सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
विशेष म्हणजे, महिलांच्या जनसुनावणीसाठी रहाटकर या मंगळवारी सीबीडी बेलापूर येथील सिडको भवन येथे उपस्थित होत्या. नाशिकमधील टीसीएस कंपनीत महिलांवर झालेल्या लैंगिक अत्याचार आणि धर्मांतराच्या आरोपांमुळे मोठी खळबळ उडाली आहे. अशा प्रकारांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष स्थानिक पथके स्थापन केली जाणार आहेत.
या पथकांमध्ये शासकीय महिला अधिकारी तसेच स्वयंसेवी संस्थांमधील महिलांचा समावेश असेल. कंपन्यांमध्ये कोणत्याही प्रकारची ‘रिंग’ तयार होऊन गैरप्रकार घडू नयेत, यासाठी व्यवस्थापनाने सतर्क राहणे आवश्यक असल्याचे रहाटकर यांनी सांगितले. या प्रकरणाच्या तपासासाठी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीश साधना जाधव यांच्या अध्यक्षतेखाली फॅक्ट-फाइंडिंग समिती नेमण्यात आली असून ती सर्व अंगांनी चौकशी करत आहे.
पीडित कुटुंबांची बाजू समजून घेतली जात असल्याची माहितीही त्यांनी दिली. दरम्यान, अमरावती येथील एका प्रकरणात तरुणांकडून मुलींवर अत्याचार करून त्यांचे व्हिडिओ बनविण्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकरणातील पीडितांनी पुढे येण्याचे आवाहन करताना त्यांना पोलिस संरक्षण दिले जाईल, असेही रहाटकर यांनी स्पष्ट केले.
नवी मुंबई, मुंबई आणि ठाणे परिसरातील महिलांवरील अन्यायाच्या तक्रारींवर राष्ट्रीय महिला आयोग समोर सुनावणी घेण्यात आली. संबंधित प्रकरणांमध्ये पुढील आठ दिवसांत न्याय देण्याचे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. राष्ट्रीय महिला आयोग तर्फे 21 एप्रिल रोजी सिडको भवन, सीबीडी बेलापूर येथे पत्रकार परिषदेत सर्व मुद्द्यांवर सविस्तर माहिती दिली.
