गणेशोत्सवाच्या कालावधीतील निर्माल्यांची विल्हेवाट लावून त्याचे नैसर्गिक खतात रूपांतरण करून ते वाटप करण्याची योजना एका सामाजिक संस्थेने सुरू केली होती. या उपक्रमाला भाविकांनी थंड प्रतिसाद दिल्याने या वर्षीचे पाच व सात दिवसांच्या गणपतींचे विसर्जन केल्यानंतर शहरातील विमला तलावात विसर्जन करण्यासाठी आलेल्या नागरिकांनी निर्माल्य येथील बागेत टाकल्याने नागरिकांची अडचण झाली होती. ते उचलण्यासाठी नगरपालिकेनेही दोन दिवस लावल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.

गणेशोत्सवात तयार होणारे निर्माल्य तलावात न टाकता त्यामुळे होणारे पाण्याचे प्रदूषण टाळण्यासाठी अनेक उपक्रम राबविले जात आहेत. असे असले तरी अनेक गणेशभक्त भावनेचे कारण देत ज्या तलावात गणेशमूर्तीचे विसर्जन केले जाते. त्याच तलावात निर्माल्य टाकीत आहेत. उरण शहर आणि परिसरात नगरपालिकेचे विमला तलाव हे एकमेव विसर्जनाचे ठिकाण आहे. तलावाकाठी मॉर्निग वॉक, ज्येष्ठ नागरिकांना बसण्याची व्यवस्था तसेच लाहानग्यांना खेळण्याची व्यवस्था आहे.

याच तलावात शनिवारी गौरीसह गणपतींचे विसर्जन झाले. त्या वेळी नागरिकांनी आणलेले निर्माल्य निर्माल्यकलशात न टाकता ते पदपथावर टाकले तसेच कलशाच्या बाहेर टाकले. तर अनेक कलश हे ओसंडून भरलेले होते. हे निर्माल्य नगरपालिकेकडून दोन दिवस उचलण्यात आलेले नव्हते. त्यामुळे उरणमधील ज्येष्ठ नागरिक श्रीधर पाटील यांनी नाराजी व्यक्त केली.

या संदर्भात उरण नगरपालिकेचे स्वच्छता विभागप्रमुख यांच्याशी संपर्क साधला असता निर्माल्य तातडीने हटविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तर निर्माल्याचे खतात रूपांतर करून टाकाऊपासून टिकाऊ हा उपक्रम आम्हा मागील दोन वर्षे राबवीत होतो. मात्र त्याला नागरिकांनी प्रतिसाद न दिल्याने ते बंद करावे लागल्याचे मत सामाजिक कार्यकर्ते प्रसाद मांडेलकर यांनी व्यक्त केले.