नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीपूर्वी अनेक इच्छुकांनी उमेदवारीसाठी पक्षनिष्ठेला तिलांजली देत पक्षांतराचा मार्ग स्वीकारला होता. ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्ष बदलून तिकीट मिळवणाऱ्यांची संख्या यंदा लक्षणीय होती. मात्र, या राजकीय संधीसाधूपणाला मतदारांनी स्पष्ट शब्दांत नकार दिल्याचे निकालातून दिसून आले आहे. पक्षाच्या विचारांशी घेतलेली फारकत मतदारांना पसंत न पडल्याने अशा उमेदवारांना थेट पराभवाचा सामना करावा लागला.

पक्षांतराचा सर्वात मोठा फटका हा ऐरोलीतील एम. के. मढवी कुटुंबाला बसल्याचे निवडणुकीच्या निकालातून स्पष्ट झाले. शिवसेनेचे (ठाकरे) नवी मुंबईतील नेतृत्व म्हणून ओळखले जाणाऱ्या मनोहर उर्फ ए.के. मढवी यांनी आचारसंहिता लागू झाल्यानंतर काही दिवसांतच पक्षाला सोडचिठ्ठी देऊन कुटुंबियांसाहित शिवसेनेत(शिंदे) प्रवेश केला होता. मात्र, या निवडणुकीत एम.के. मढवी (४-ड) सह त्यांच्या पत्नी विनया मढवी (५ ड) आणि सुनबाई तेजश्री करण मढवी (५ क)यांना पराभवाचा सामना करावा लागला.

शिवसेनेचे (ठाकरे) नवी मुंबईतील अनुभवी आणि ज्येष्ठ नेते असलेले विठ्ठल मोरे यांनीही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटच्या एकदिवस आधी भाजपात प्रवेश करत आपल्या मुलासाठी तिकीट पक्के केले होते. मात्र, त्यांचा मुलगा अवधूत मोरे (१७ ड) यांनाही पराभवाचा सामना करावा लागला. सानपाडा विभागातील माजी नगरसेवक सोमनाथ वास्कर (प्रभाग १९ अ) आणि त्यांच्या पत्नी कोमल वास्कर (१९ ब) यांनी शिवसेना (ठाकरे गट) सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. दोघांनाही अपेक्षित जनसमर्थन मिळू शकले नाही.

तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष असलेले नामदेव भगत आणि त्यांच्या पत्नी इंदुमती भगत यांनी निवडणुकीच्या अवघ्या काही दिवसांपूर्वी शिवसेना (शिंदे) मध्ये प्रवेश केला होता. तेही पराभूत झाले. भाजपचे जिल्हा मंत्री असलेले दत्ता घंगाळे आणि त्यांच्या पत्नी अश्विनी घंगाळे यांनी उमेदवारी अर्ज सादर करण्याच्या काही तास आधीच शिवसेना (शिंदे) मध्ये प्रवेश केला होता. प्रभाग क्रमांक २६ अ आणि २६ ब मधून त्यांनी निवडणूक लढवली; मात्र या अचानक झालेल्या राजकीय बदलालाही मतदारांनी नकार दिला. यासोबतच भाजपच्या युवती प्रमुख सुहासिनी नायडू (२२ क) यांनाही पक्षाने तिकीट नाकारल्याने त्यांनीही शेवटच्या काही तासांत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात प्रवेश करत निवडणूक लढवली परंतु त्याही पराभूत झाल्या.

याचप्रमाणे काँग्रेसचे रवींद्र सावंत (२२ अ) यांनीही उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या काही तासांपूर्वी शिवसेनेत (शिंदे) प्रवेश करत तिकीट मिळवले. परंतु, त्यांनाही जनतेने अपेक्षित मतदान केले नाही. यासोबतच नेरूळ येथील शिवसेनेचे (ठाकरे) रतन मांडवे (२३ अ), काशिनाथ पवार(२४ ड) यांनीही शिवसेनेत(शिंदे) प्रवेश केला होता. त्यांनाही पराभवाचा सामना करावा लागला.

शिंदे सेनेतील प्रवेश तोट्याचा

यंदाच्या महापालिका निवडणुकीत ऐनवेळी शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केलेल्या उमेदवारांनाच सर्वाधिक फटका बसल्याचे स्पष्ट झाले आहे. ऐरोलीतील एम. के. मढवी कुटुंब, सानपाड्यातील माजी नगरसेवक सोमनाथ वास्कर व कोमल वास्कर, तसेच नामदेव-इंदुमती भगत, दत्ता घंगाळे-अश्विनी घंगाळे, रवींद्र सावंत, रतन मांडवे आणि काशिनाथ पवार यांसारख्या अनेकांनी शिंदे गटात प्रवेश करून निवडणूक लढवली; मात्र अपेक्षित जनसमर्थन मिळाले नाही.