घरे तयार असताना ताबा मिळत नसल्याची खंत

नवी मुंबई : दोन वर्षे प्रतीक्षेवर ठेवत दोन ते तीन लाखांचा अतिरिक्त भुर्दंड लावून सिडकोने २०१८ व २०१९ मधील प्रतीक्षा यादीवरील लाभार्थीना इरादापत्रे दिली आहेत. मात्र घरे तयार असताना ताबा घेण्यासाठी मात्र सहा महिने ते एक वर्षांची प्रतीक्षा कायम ठेवली आहे. त्यामुळे या लाभार्थीमध्ये नाराजी आहे.

सिडकोने पहिला हप्ता हा लाभार्थीनी भरावा अशी अट घातली आहे. यातील अनेकांनी पहिला हप्ता भरला असून बँकांकडून गृहकर्ज घेतले आहे. मात्र सिडकोने दिलेल्या मुदतीतच त्यांचे पुढील हप्ते बँकेतून सिडकोला जमा होणार आहेत. त्याऐवजी सिडकोने यात सवलत देत एकाच वेळी उर्वरित रक्कम बँकांकडून घ्यावी व तयार घरांचा ताबा द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे. यामुळे पुढील सहा महिने ते एक वर्षांचा भाडय़ापोटी बसणारा भुर्दंड तरी वाचू शकतो असे त्यांचे म्हणणे आहे. विनाकारण हा दुहेरी भुर्दंड का? असा सवालही सचिन खरात या लाभार्थीने  केला आहे.

प्रतीक्षा यादीवरील एक हजार ८०० लाभार्थीना इरादा पत्रे पाठविण्यात आलेली आहेत. यातील पात्र लाभार्थी घरांची संपूर्ण रक्कम भरून घरांचा ताबा घेण्यास तयार आहेत पण सिडकोची त्याबाबत तयारी नसल्याचे दिसून येत आहे.

सिडकोने या घरांची २ ऑक्टोबर २०१८ रोजी सोडत काढली होती. त्यासाठी पावणेतीन लाख अर्ज आले होते. पहिल्या टप्प्यात १४ हजार ८३७ आणि नंतर ९ हजार २८८ घरांच्या सोडतीत नंतर केलेल्या छाननीत सात हजारांपेक्षा जास्त अर्जदार अपात्र ठरलेले आढळून आलेले आहेत. सिडकोच्या सोडत प्रणालीनुसार या २४ हजार घरांच्या सोडतीच्या वेळी प्रतीक्षा यादीदेखील तयार करण्यात आली होती. एखादा लाभार्थी अपात्र ठरल्यास त्याचे घर प्रतीक्षा यादीवरील पात्र लाभार्थीची तरतूद करण्यात आली होती. गेल्या वर्षीपासून सुरू झालेल्या करोना साथरोगामुळे अनेक लाभार्थीचे रोजगार गेले तर काही जणांना वेतन कपातीली समोरे जावे लागले. त्यामुळे सिडकोच्या घरांवर काही लाभार्थीनी पाणी सोडलेले आहे. त्यांच्या जागी सिडकोने प्रतीक्षा यादीवरील लाभार्थीना इरादापत्रे दिली असून घराची रक्कम भरण्यास मुदत दिली आहे. सिडकोने पहिल्या टप्प्यात एक हजार ८०० लाभार्थीनी घरांचे इरादापत्र दिली असून या लाभार्थीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आणखी तीन हजार लाभार्थीनी इरादापत्रे दिली जाणार आहेत. त्यामुळे ही संख्या पाच हजारांच्या घरात जाण्याची शक्यता आहे. प्रतीक्षा यादीवरील लाभार्थीना सिडकोने करोना संकटकाळ असतानादेखील दोन ते अडीच लाख रुपये घराच्या क्षेत्रफळानुसार जादा आकारले आहेत. त्याची तक्रार थेट पंतप्रधान कार्यालयात करण्यात आलेली आहे पण घरांचा बांधकाम खर्च आणि महागाई यामुळे सिडकोला ही किंमत आकारावी लागली आहे. पंतप्रधान आवास योजनेतील केंद्र सरकारचा लाभार्थीसाठी असलेला हिस्सादेखील सिडकोने या वेळी भरला आहे. सिडकोने इरादापत्र दिलेल्या प्रतीक्षा यादीवरील हजारो लाभार्थीनी पहिला हप्ता भरला असून विविध बँकांची कर्ज प्रक्रिया पूर्ण केली आहे. त्यामुळे सिडकोची पाच नोडमध्ये घरे तयार असताना संपूर्ण रक्कम घेऊन लाभार्थीना घरांचा ताबा का दिला जात नाही असा सवाल उपस्थित होत आहे.

सिडकोच्या तिजोरीत भरच पडेल..

तिजोरी रिकामी झाल्याने सिडको सध्या भूखंड विक्रीवर भर दिला आहे. मात्र तयार घरांचा ताबा सिडकोने प्रतीक्षा यादीवरील लाभार्थीना एक-दोन महिन्यांत दिल्यास त्यांची सर्व रक्कम सिडको तिजोरीत जमा होणार आहे. या लाभार्थीची संख्या हजारोंच्या संख्येत असल्याने सिडकोला एकाच वेळी येणारी रक्कम कोटय़वधींच्या घरात असणार आहे. तसेच लाभार्थीचे भाडय़ापोटी जात असलेले हजारो रुपयेही वाचणार आहेत.