नवी मुंबई : नवी मुंबई मेट्रो सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने सिडकोने स्थापत्य कामांचा वेगात निपटारा केला असून अत्यावश्यक सर्व चाचण्या झाल्या आहेत. मात्र या सेवेच्या शुभारंभासाठी केंद्र सरकारकडून अद्याप हिरवा कंदील मिळालेला नाही. त्यामुळे १ मे महाराष्ट्रदिनी ही सेवा सुरू होण्याची शक्यता आता मावळली आहे. या सेवेच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वेळ अपेक्षित आहे.
ही सेवा सुरू करण्यासाठी आवश्यक ऑसिलेशन, विद्युत सुरक्षा आणि अत्यावश्यक ब्रेक या चाचण्या पूर्ण करून त्यांची प्रमाणपत्रेदेखील मिळवली आहेत. रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून जानेवारीत सुरक्षा चाचणीदेखील घेण्यात आली असून मेट्रो कोचला रेल्वे महामंडळाकडून मंजुरी मिळालेली आहे.
महामुंबई क्षेत्रातील सार्वजिनक परिवहन सेवा अधिक सक्षम करण्यासाठी सिडकोने चार उन्नत मार्ग प्रस्तावित केले आहेत. यातील बेलापूर ते पेंधर या ११ किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गाचे काम मे २०१२ रोजी सुरू झाले होते. गेली सात वर्षे हा रखडला आहे. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी हा प्रकल्प सुरू करण्याच्या दृष्टीने गेली दीड वर्षे अधिक लक्ष दिले असून डिसेंबर २०२१ पर्यंत या प्रकल्पातील किमान पाच किलोमीटर लांबीचा मार्ग सुरू करण्याच्या दिशेने प्रयत्न केले आहेत. या प्रकल्पाचे विहित मुदतीत काम पूर्ण व्हावे यासाठी नागपूर व पुणे मेट्रो मार्ग उभारणाऱ्या महामेट्रोची नियुक्ती करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय डॉ. मुखर्जी यांनी घेतल्याने या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील काम अंतिम टप्प्यात आले आहे. खारघर ते पेंधर या पाच किलोमीटर लांबीचा पहिला मार्ग सुरू करण्याच्या दृष्टीने त्याच्या आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. या मार्गावरील स्थापत्य कामे गेल्या वर्षी पूर्ण करण्यात आलेली आहेत.
हा मार्ग तळोजा एमआयडीसीतील कामगार आणि उद्योजकांच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त आहे. या मार्गावर सीएमआरएसची चाचणीदेखील जानेवारी महिन्यात पूर्ण झाली असून केवळ केंद्र सरकारच्या परवानगीची सिडकोला प्रतीक्षा आहे. त्यानंतर रेल्वे मंडळात हा मार्ग सुरू करण्यावर मोहर उमटविण्याचे सोपस्कार शिल्लक राहणार आहेत.
महामुंबईतील पहिल्या मेट्रोचा शुभांरभ मोदी यांच्या उपस्थित व्हावा यासाठी केंद्र व राज्य सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. त्यांची वेळ निश्चित झाल्यानंतर ही सेवा सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. १ मे महाराष्ट्रदिनी ही सेवा सुरू करण्याचे राज्य सरकारचे प्रयत्न होते. मात्र हा मुहूर्तही आता अशक्य आहे.