नवी मुंबई : उड्डाणपुलासाठी कोटय़वधी रुपये खर्च करण्यास निघालेल्या पालिका प्रशासनाने पामबीच मार्गावरील वाशी ते कोपरीदरम्यान होत असलेल्या बेकायदा पार्किंग या मूळ प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याने हा प्रश्न आता जटिल झाला आहे. पालिका प्रशासनाकडून यावर ठोस उपाययोजना होत नाही. यावर पर्याय म्हणून रस्त्यालगत भींत बांधण्याचे पालिकेने ठरवले हाते. मात्र त्याबाबतही ठोस काहीही झालेले नाही. त्यामुळे हा प्रश्न कायम आहे.
बेलापूर किल्ले गावठाण चौकापासून वाशी अरेंजापर्यंत पामबीच मार्गावर कोठेही पार्किंग होत नाही. मात्र अरेंजा कॉर्नर ते कापरी गाव या दरम्यान ही समस्या गंभीर झाली आहे. या रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी राहत असल्याने वाहतूक कोंडीसह अपघाताला आमंत्रण मिळत आहे. त्यामुळे येथील सतरा प्लाझा हा पार्किंग प्लाझा झाल्याचे वास्तव आहे. वाहतूक विभागाकडून तात्पुरती कारवाई होते. मात्र त्यांची पाठ फिरताच वाहने परत रस्त्यावर उभी केली जातात. हा प्रकार गेली अनेक वर्षांपासून सुरू आहे.
अरेंजा कॉर्नर ते कोपरी हा वाशीतील महत्त्वाचा रहदारीचा रस्ता असून, त्या मार्गावर दोन्ही बाजूला प्रत्येकी तीन मार्गिका आहेत. मात्र, त्यापैकी दोन्ही बाजूच्या एकेक मार्गिका बेकायदा वाहन पार्किंग आणि वाहनांचे सुटे भाग विकणाऱ्या दुकानांसमोर लागणाऱ्या वाहनांनी अडवून ठेवलेल्या असतात. परिणामी गर्दीच्या वेळी या रस्त्यावर वाहतूक कोंडी होते. ही वाहने हटवून रस्ता मोकळा करण्याऐवजी पालिकेने उड्डाणपूूल उभारण्याचे ठरविले आहे. रोगापेक्षा इलाज भयंकर अशी म्हणण्याची वेळ आली आहे. ही अनधिकृत वाहने हटवल्यास सर्व मार्गिका मोकळय़ा होऊन रस्ता रहदारीसाठी पूर्णपणे खुला होऊ शकतो. तसेच येथील गोदामांना रस्त्याच्या बाजूने दिलेला बेकायदा प्रवेश बंद केल्यास या मार्गावरील वाहतूककोंडी कायमची सुटेल. ते करण्याऐवजी पालिकेने येथे उड्डाणपूल उभारण्याचे योजले आहे.
या मार्गावर सुमारे १२५ नो पार्किंगचे फलक लावले आहेत. मात्र या फलकांखालीच ही वाहने उभी केली जात आहेत.
अडथळे खांबांचा खर्च वाया
हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर सिडकोने सतरा प्लाझा व दुकाने यांना पामबीच मार्गाच्या दिशेने प्रवेशच नसल्याचे न्यायालयात सांगण्यात आले होते. त्यामुळे या ठिकाणी तत्कालीन आयुक्त एन. रामस्वामी यांनी ७० लाख खर्चातून संरक्षक भिंत उभारण्याचे निश्चित केले होते. परंतु ते कागदावरच राहिले आहे. त्याऐवजी पालिकेने येथे अडथळे खांब उभारले आहेत. त्यासाठी ५ लाखांचा खर्च करण्यात आला आहे. त्याचा काही उपयोग झाला नाही.
संरक्षण भिंत उभारण्यासाठी पालिकेने निश्चित केले होते. पण त्याला नागरिक व दुकानदार यांचा विरोध झाला होता. त्यामुळे पालिकेने येथे रस्त्यावर वाहने उभी राहू नये म्हणून अडथळे खांबउभारले आहेत. तरी देखील येथे वाहनांचे बेकायदा पार्किंग होत आहे. -संजय देसाई, शहर अभियंता