scorecardresearch

नवी मुंबई: माथाडी कामगारांचा अपेक्षा भंग,संपाचा इशारा

एक दिवसाचा लाक्षणिक संप माथाडी कामगारांच्या वतीने पुकारण्याचा इशारा माथाडी नेते आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी दिला आहे

narendra patil
नरेंद्र पाटील

भाजप आणि शिवसेनेच्या शिंदे गटाचे सरकार अस्तित्वात येऊन सहा महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाला असून या सरकार कडून राज्यातील इतर जनतेप्रमाणे लाखो माथाडी कामगारांची त्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडवले जातील अशी अपेक्षा होती पण ती फेल ठरली असून माथाडी कामगारांचा अपेक्षा भंग झाला आहे .त्यामुळे एक फेब्रुवारी रोजी एक दिवसाचा लाक्षणिक संप माथाडी कामगारांच्या वतीने पुकारण्याचा इशारा माथाडी नेते आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी दिला आहे .पाटील हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात त्यामुळे त्यांनी सरकारला हा घराचा आहेर दिला असल्याचे मानले जात आहे. माथाडी संपाच्या या इशाऱ्याने विद्यमान सरकार सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यात अपयशी ठरत असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे.

हेही वाचा >>>नवी मुबंई: बाईक कार रॅलीद्वारे कर्करोगाची जनजागृती

राज्यात विविध कारखाने आणि बाजारपेठेत लाखो माथाडी कामगार गेली अनेक वर्षे चढ उताराची कामे करीत आहेत. या कामगारांच्या अनेक छोट्या मोठ्या कामगार संघटना कार्यरत आहेत .या सर्व कामगार संघटनेत स्वर्गीय आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या महाराष्ट्र राज्य माथाडी आणि ट्रान्सपोर्ट जनरल कामगार संघटना ही सर्वात मोठी कामगार संघटना सक्रिय आहे .या कामगार संघटनेच्या वतीने सरकार कडे वेळोवेळी कामगारांचे प्रश्न मांडले जातात पण हे प्रश्न अद्याप सुटलेले नाहीत. त्यामुळे या कामगार संघटनेला वेळोवेळी आंदोलन करावे लागते या कामगार संघटनेने दोन आमदार दिले आहेत. त्यातील एक नेते शशिकांत शिंदे राष्ट्रवादी ची धुरा सांभाळत आहेत तर दुसरे नरेंद्र पाटील यांनी दोन वर्षांपूर्वी राष्ट्रवादीला रामराम ठोकून भाजप ची कास धरली आहे दोन्ही पक्षाची सरकारे राज्यात येऊन गेली आहेत .

हेही वाचा >>>नवी मुंबई : अल्पवयीन मतिमंद मुलीचे अपहरण करून बलात्कार, दोन आरोपींना अटक

तरीही या कामगार संघटनेचे प्रश्न प्रलंबित आहेत याचे आश्चर्य व्यक्त केले जाते माथाडी कामगार असंतुष्ट कायम राहावा यासाठी या प्रश्नाचे असेच घोंगडे जाणूनबुजून भिजत ठेवले जाते का अशी शंका आता माथाडी कामगार घेऊ लागले आहेत. पन्नास वर्षे जुन्या माथाडी कायद्यात बदल केला जावा, माथाडी कामगार चळवळीत घुसलेल्या अपप्रवृत्ती ला आळा घालावा, माथाडी कामगारांच्या मुलांना नोकरीत सामावून घ्यावे प्रलंबित कामगारांच्या घरांचा प्रश्न माथाडी मंडळातील अधिकारांची दादागिरीला लगाम घालण्यात यावा यासारखे प्रश्न लवकरात लवकर सोडवण्यात यावे यासाठी एक फेब्रुवारी रोजी लाक्षणिक संप पुकारण्यात येईल असे पाटील यांनी जाहीर केले असून सोमवारी या संपाची औपचारिक घोषणा केली जाणार आहे. दोन दिवसात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडून दबाव आल्यास हा संप गुंडाळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-01-2023 at 20:59 IST