कुंडय़ा गायब; कचरा कायम ; कचरामुक्त शहराचे महापालिकेचे नियोजन बारगळले

केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानात नवी मुंबई शहर पहिल्यापासून आघडीवर आहे.

नवी मुंबई :  स्वच्छ भारत अभियानात देशात प्रथम येण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या नवी मुंबई महापालिकेत कचरा समस्या आजही कायम आहे. महापालिका प्रशासनाने शहरातील कचरा कुंडय़ा हटविल्या मात्र काही जागांवर आजही कचरा टाकला जात आहे. तर सीवूड्स परिसरात भूमिगत कचरा कुंडीची प्रायोगिक तत्त्वावर राबवलेली योजनाही बारगळल्याचे दिसत आहे.

केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानात नवी मुंबई शहर पहिल्यापासून आघडीवर आहे. शहराने राज्यातील पहिला क्रमांक कायम ठेवला असून देशात गेल्या वर्षी तिसरा क्रमांक पटकावला आहे. या वर्षी करोनाशी सामना करीत महापालिका प्रशासनाने देशात प्रथम क्रमांक पटकाविण्याचा इरादा व्यक्त करीत काम केले आहे. मात्र अद्याप या स्पर्धेचा निकाल जाहीर झालेला नाही.

महापालिका प्रशासनाने कचरामुक्त शहराचे नियोजन करीत रस्त्यावरील कचरा कुंडय़ा हटविल्या आहेत. कुंडय़ा नसतील तर लोक कचरा टाकणार नाहीत अशी धारणा होती. मात्र शहरातील ही कचरा समस्या आजही कायम आहे. काही मोजक्या ठिकाणी नेहमी कचरा पडलेला दिसतो. कोपरखैरणेतील तीन टाकी चौक, खाडी किनारी स्मशान भूमी जवळ, आगासकर आळी समोरील झोपडपट्टी समोर, जुहू गाव सार्वजनिक स्वच्छता गृहासमोर, तर तुर्भे, दिघा परिसरात अनेक ठिकाणी कचरा पडलेला दिसतो.

कचरामुक्त शहराचे पुढचे पाऊल म्हणून महापालिका प्रशासनाने भूमिगत कचरा कुंडय़ा ही संकल्पना राबविण्याचे ठरविले आहे. मात्र गेली दोन वर्षे फक्त याबाबत घोषणाच होत आहेत. सीवूड्समध्ये सामाजिक दायित्व निधीतून हा उपक्रम राबविण्यात आला आहे. मात्र तेथीही ती यशस्वी झाली नाही. त्यामुळे शहरभर ही योजना राबविण्याबाबत प्रशासनात संभ्रम दिसत आहे. ही योजना ज्या ठिकाणी नेहमी कचरा टाकला जातो त्या ठिकाणी राबविणे गरजेचे असताना नको त्या ठिकाणी पालिका प्रयोग करीत असल्याचे पालिकेच्याच एका निवृत्त अधिकाऱ्याने सांगितले.

रात्रीच्या फेऱ्यांत वाढ

कचरा टाकत असलेल्या ठिकाणी कधी रांगोळी काढली तर कधी फुलझाडांच्या कुंडय़ा ठेवल्या. काही ठिकाणी तर कर्मचाऱ्यांचा पहारा दिला. मात्र त्याचा फारसा उपयोग झाल्याचे दिसत नाही. त्यामुळे आता रात्री व पहाटे अशा कचरा वाहू वाहनांच्या फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत.

भूमिगत कचरा कुंडी संकल्पना आणखी व्यापक स्वरूपात राबविण्याची गरज आहे. नुकतीच याबाबत बैठक झाली आहे. दिवाळीनंतर ठोस निर्णय घेत अंमलबजावणी करण्यात येईल.

सुजाता ढोले, अतिरिक्त आयुक्त, घनकचरा विभाग, महापालिका

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नवी मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Waste problem in navi mumbai municipal corporation is still persists zws

Next Story
शांत व आरोग्यदायी झोपेसाठी सेंद्रिय बिछाना
ताज्या बातम्या