नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेचे कचरा वाहतूक व्यवस्थापन एका क्लिकवर उपलब्ध झाले आहे. त्यासाठी पालिका मुख्यालयात असलेल्या सीसीटीव्ही नियंत्रण कक्षाप्रमाणेच कचरा वाहतूक नियंत्रण कक्ष कार्यरत झाला आहे. या घनकचरा विभागाच्या नियंत्रण कक्षामुळे तसेच येथील शहरातील आठही विभाग कार्यालयात असलेल्या विभागनिहाय डॅशबोर्डमुळे शहरात कचराकोंडीवर नियंत्रण सुरू झाले आहे.
मागील दोन वर्षे सातत्याने कचरा वाहतूक व संकलन कामाला पालिकेकडून मुदतवाढ दिली जात होती. परंतु यंदाच्या प्रजासत्ताक दिनापासून ९३४ कोटी रुपये खर्चाच्या बहुचर्चित कचरा वाहतूक व संकलन कामाचा श्रीगणेशा झाला. तर आता कचरा वाहतुकीची संपूर्ण माहिती डॅशबोर्डद्वारे एका क्लिकवर उपलब्ध होत आहे. त्यामुळे या कामात अधिक नियंत्रण व सुव्यवस्थितपणा येऊ लागला आहे. नवी मुंबई महापालिकेने या नव्या कामाच्या कार्यादेशानुसार कामाला सुरुवात झाली असून ठेकेदाराकडून शहरात एकूण २४ हजार कचराकुंड्यांचे वाटप करण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. दुसरीकडे पालिका इतिहासात प्रथमच ई कचरा वाहतुकीचाही श्रीगणेशा झाला आहे.
ठेकेदाराला दिलेल्या ठेक्यामध्ये नमूद असल्याप्रमाणे ठेकेदाराने एकदा सोसायट्यांना कुंड्या द्यायच्या असून शहरात निळ्या व हिरव्या रंगाच्या २४ हजार कचऱाकुंड्यांचे वाटप केले जात आहे. तर याच ठेक्यानुसार ठेकेदाराकडून पालिका मुख्यालयात व पालिका विभाग कार्यालयात डॅशबोर्ड व नियंत्रण कक्ष तयार करण्यात आला आहे. त्यामुळे पालिकेत सज्ज करण्यात आलेल्या डॅश कचरा वाहतूक नियंत्रण कक्षाच्या डॅशबोर्डवर कचरा वाहतूक गाडी कचरा वाहतूक कामासाठी निघाल्यापासून ते डंपिंग ग्राऊंडवर कचरा टाकेपर्यंत त्या गाडीची माहिती मिळणार आहे. त्यामुळे कचरा वाहतूक गाडी कोणत्या विभागात कोणत्या प्रभागात व कोणत्या ठिकाणचा कचरा जमा करते त्याची नोंद पालिकेकडे होत आहे.
पालिकेतील मुख्य नियंत्रण कक्षामुळे व डॅशबोर्डमुळे एका क्लिकवर सर्व माहिती उपलब्ध होत आहे. त्यामुळे कचरावाहतूक नियंत्रण कक्षामुळे अत्यंत बारकाईने लक्ष ठेवले जात असून एखाद्या ठिकाणी कचरा उचलला नसल्याची तक्रार प्राप्त झाली तरी त्याची तात्काळ कार्यवाही करता येत आहे. -डॉ. अजय गडदे, उपायुक्त, घनकचरा विभाग, परिमंडळ १