सिडको वसाहतींची पाणी चिंता मिटणार

वाढते नागरीकरण आणि घटते जलस्रोत असे चित्र सध्या आहे.

दैनंदिन १२७५ दशलक्ष लीटर पाण्याचे नियोजन

नवी मुंबई : आंतरराष्ट्रीय विमानतळ, मेट्रो, नैना, महागृहनिर्मिती या प्रकल्पामुळे महामुंबई क्षेत्राची लोकसंख्या येत्या काळात झपाटय़ाने वाढणार असल्याने सिडकोने २०५० पर्यंत या वाढत्या नागरिकीकरणाला लागणाऱ्या दैनंदिन वापरातील १२७५ दशलक्ष लिटर पाण्याचे नियोजन करण्यास प्राधान्य दिले आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या पाण्याच्या स्रोताचा पूर्ण क्षमतेने वापर करणे व नवीन जलस्रोताचे नियोजन करण्यात येत असून पाणी प्रश्न सुटणार असल्याचा दावा सिडकोने केला आहे.

बेलापूर (नवी मुंबई), पनवेल, उरण या तीन तालुक्यांत मोठय़ा प्रमाणात नागरीकरण होत असून सध्या असलेल्या वीस लाख लोकसंख्येत दुप्पट अथवा तिप्पट वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याशिवाय अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प या भागात विकसित होत आहेत. त्यामुळे वाढते नागरीकरण आणि घटते जलस्रोत असे चित्र सध्या आहे. सिडको पेण तालुक्यातील हेटवणे धरणाचे पाणी दक्षिण नवी मुंबईच्या भागाला देत आहे, पण हे पाणी आता कमी पडू लागले आहे. त्यासाठी सिडकोने उरण येथील जीवन प्राधिकरणाच्या तिसऱ्या टप्प्यातील ६९ दशलक्ष लिटर पाणी राखीव ठेवण्यासाठी सिडकोने ११८ कोटी रुपये एमजेपीला अदा केले आहेत. त्यामुळे उरण तालुक्यात विकसित होणारे उलवा, द्रोणागिरी, पुष्पकनगर यासारख्या सिडको नोडमधील पाणीप्रश्न सुटणार आहे. न्हावा शेवा योजनेतून २२८ दशलक्ष लिटर पाणी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

करंजाडे व काळुंद्रे वसाहतीसाठी ३५ दशलक्ष लिटर पाणी राखीव ठेवण्यात आले आहे. याच नोडच्या जवळ विकसित होणारे नैना क्षेत्राचा विस्तार हा मोठा आहे. या भागातील नैना क्षेत्राला लागणाऱ्या पाण्याचे नियोजन केले जात आहे.

सिडकोच्या दक्षिण नवी मुंबईसाठी सध्या हेटवणे धरण, जीवन प्राधिकरणाच्या पाताळगंगा प्रकल्प, नवी मुंबई पालिका व एमआयडीसीचे बारवी धरण यातून एकूण २५९ दशलक्ष लिटर पाणी दररोज पुरवठा होत आहे, मात्र या क्षेत्रात सध्या २८९ दशलक्ष लिटर पाण्याची गरज असून वीस दशलक्ष लिटर पाण्याचा तुटवडा जाणवत आहे.

सिडकोला कर्जत येथील कोंढाणे धरण मोठा आधार ठरणार आहे.  यातून सिडकोला २५० दशलक्ष लिटर पाणी दररोज मिळणार आहे. हा प्रकल्प लवकर मार्गी लागावा यासाठी  सल्लागार नेमण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या सुसाध्यता अहवाल तयार करण्यासाठी सिडकोने एक कोटी ९७ लाखांचा निधी उपलब्ध केला आहे. याशिवाय या धरणाच्या आरेखनाचे काम नाशिक येथील जलसंपदा विभागाकडे सोपविण्यात आले असून त्यांनाही अडीच कोटी रुपये अदा करण्यात आलेले आहेत.

या नवीन प्रकल्पाबरोबरच सिडकोने हक्क सांगितलेल्या पहिल्या हेटवणे धरणातील १२० दशलक्ष पाण्यावर दावा सांगण्यात आला आहे. त्यासाठी कोकण पाटबंधारे विभागाला ११९ कोटी रुपये आगाऊ देण्यात आलेले आहेत. सिडकोने वीस वर्षांपूर्वी या धरणाच्या पाण्यासाठी ४७ कोटी रुपये देऊन १०० दशलक्ष लिटर पाणी विकत घेतले होते.

या धरणाची क्षमता २७० दशलक्ष लिटपर्यंत वाढविण्यासाठी सिडको निधी आणि प्रोत्साहन दोन्ही देत आहे. त्यामुळे भविष्यात दररोज लागणारे १२७५ दशलक्ष लिटर पाण्याचे नियोजन करण्यासाठी सिडको रायगड जिल्ह्य़ातील विविध शक्यता पडताळून पाहात असून नवीन जलस्रोताचा शोध घेत आहे.

महामुंबईची वाढती लोकसंख्या आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्प यामुळे या क्षेत्रातील पाण्याची गरज कैकपटीने वाढणार असून त्याचे नियोजन केले जात आहे. त्यासाठी विविध पाणीपुरवठा योजना राबविल्या जात असून अस्तित्वात असलेल्या स्रोताचा विकास केला जात आहे, तर नवीन योजनांची निर्मिती केली जाणार आहे. भविष्यातील पाण्याचे नियोजन आज करणे आवश्यक आहे. सिडकोने त्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. त्यासाठी उपलब्ध पाण्याचे नियोजन, जलस्रोताचा पूर्ण क्षमतेने वापर आणि नवीन जलस्रोताची निर्मिती ही त्रिसूत्री तयार करण्यात आली आहे.

डॉ. संजय मुखर्जी, व्यवस्थापकीय संचालक, सिडको

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Water concern of cidco colonies will disappear navi mumbai ssh

ताज्या बातम्या