पनवेल : तळोजा औद्योगिक वसाहतीत गेल्या महिनाभरापासून पाणीटंचाई आहे. यावर अनेक उपाययोजना केल्या तरी हा प्रश्न कायम असल्याने आता पाण्याविना कारखाना चालवायचा कसा, असा प्रश्न उपस्थित केला आहे. पाणी कमी पडल्याने बॉयलर फाटण्याचा धोका असल्याने सुरक्षेचा प्रश्नही निर्माण झाला आहे. त्यामुळे त्रस्त व्यावसायिकांनी पोलीस व औद्योगिक विकास महामंडळावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे.
तळोजा औद्योगिक क्षेत्रात लहान-मोठे सुमारे ९०० हून अधिक कारखाने आहेत. प्रक्रिया करून विविध उत्पादने घेणारे कारखाने तळोजात असल्याने पाण्याशिवाय प्रक्रिया कशी करावी, असा प्रश्न अनेक कारखान्यांना पडला आहे.
गेल्या महिनाभरापासून पाण्याच्या कमतरतेमुळे औद्योगिक विकास महामंडळाने सर्वच कारखान्यांना पाणी मिळावे यासाठी क्षेत्रीय पद्धत राबवून ८ ते १० तास पाणीपुरवठा सुरळीत होईल असे नियोजन केले. मात्र क्षेत्रीय पद्धतीने पाणीपुरवठा केल्याने रात्रीच्या वेळेस पाणीपुरवठा होतो. मात्र त्यावेळेस कंपनी
बंद असते अशा स्थितीत पाणी भरून ठेवले जात नसल्याने ही समस्या निर्माण झाल्याचे औद्योगिक विकास मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र पाण्याशिवाय उद्योग चालवावे कसे, असा प्रश्न सध्या तळोजातील शेकडो कारखानदारांना भेडसावत आहेत.
ज्या कारखान्यांमध्ये उत्पादन घेण्यासाठी पाण्याची आवश्यकता आहे असे उद्योजक पाण्याचे टँकर खरेदी करून पाण्याची साठवणूक करत आहेत. साडेसात हजार रुपयांना पाण्याचे टँकर कारखानदार खरेदी करत आहेत. मोठय़ा कारखान्यांना मात्र पाणीपुरवठा सुरळीत केला जात असल्याचा आरोप उद्योजकांकडून केला आहे. त्यामुळे पाण्याची अनियमितता थांबवा अन्यथा कारखाने बंद होतील अशी वेळ तळोजातील लहान कारम्खान्यांवर येईल, असे मत टीएमएचे अध्यक्ष शेखर श्रंगारे यांनी व्यक्त केले आहे. या गंभीर परिस्थितीकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मोर्चा काढणार असल्याची माहिती त्यांनी सांगितले. ते औद्योगिक विकास महामंडळाकडून टंचाई नसल्याचे सांगण्यात आले.
पाणीटंचाई नाही
याबाबत औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता तळोजात पाणीटंचाई नाही. ५४ दशलक्ष लिटर पाण्याची मागणी आहे आणि तेवढाच पाणीपुरवठा औद्योगिक क्षेत्राला केला जात आहे. मात्र सर्वाना पाणी मिळावे यासाठी क्षेत्रीय पद्धतीने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यात जेथे शेवटची जलवाहिनी आहे तेथे कधीकधी पाणी उशिरा पोहचते. तर काहींना रात्रीच्या वेळी पाणीपुरवठा होतो. लवकरच याबाबत उद्योजकांसोबत चर्चा करून पाणीपुरवठय़ाचा प्रश्न सुटेल.