संतोष जाधव
नवी मुंबई</strong> : जलसंपन्न महापालिका म्हणून नावलौकीक असलेल्या नवी मुंबई महापालिकेवर यावर्षी पाणी कपातीचे संकट ओढवले आहे. नवी मुंबई शहरात येत्या २० जूनपर्यंत पाऊस न पडल्यास पाणी नियोजनासाठी सद्या शहरात एका विभागात आठवड्यातून एक दिवस संध्याकाळचा पाणीपुरवठा बंद करण्यात येतो. तो वाढवून आठवड्यातून २ दिवस विभागवार संध्याकाळचा पाणीपुरवठा बंद केला जाणार असल्याची तयारी महापालिकेने केली आहे.त्यामुळे शहरात पाणी कपातीचे संकट अधिक गडद झाले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार लांबणीवर पडणारा पाऊस व पावसाचे प्रमाण कमी राहणार असल्याने पालिकेने पाणीपुरवठ्याबाबत योग्य नियोजन करण्याचे सूचित केल्याप्रमाणे नवी मुंबई महापालिकेने २८ एप्रिलपासूनच पाणीकपातीला सुरुवात केली आहे.त्यातच जून महिन्यातही पावसाचे दिवस कोरडे गेले असल्याने पालिकेने पाणीपुरवठ्याबाबत नियजन केले असून विभागवार आठवड्यातून एक दिवस संध्याकाळचा पाणीपुरवठा न करण्याऐवजी दोन दिवस पाणीपुरवठा न करण्याचा निर्णय घेण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. त्यामुळे पुढील दोन तीन दिवसात पाऊस सुरु न झाल्यास सध्या सुरु असलेल्या पाणीकपातीत आणखी वाढ होण्याची दाट शक्यता आहे. गेल्यावर्षीही धरण क्षेत्रात कमी पावसाची नोंद झाल्याने मोरबे धरण पूर्णपणे भरले नव्हते.
दिवसेंदिवस नवी मुंबई शहरातील पाण्याचा वापरही वाढत असून धरण पूर्ण भरले नसल्याने सद्यस्थितीला मोरबे धरणात फक्त अवघा २५.६४ टक्केच पाणीसाठा शिल्लक असून फक्त ४३ दिवस पुरेल एवढाच पाणीसाठी धरणात शिल्लक आहे. त्यामुळे २० जूनपर्यंत पावसाला सुरवात न झाल्यास नवी मुंबई शहरात सुरु असलेल्या पाणी कपातीत आणखी वाढ होणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून मिळालेली आहे.सरासरी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच मोरबे धरण परिसरात पावसाला सुरवात होते. परंतू यावर्षी जून महिन्याचे १५ दिवस झाले तरी पावसाची सुरवात झाली नाही. त्यामुळे नवी मुंबईकरांची चिंता आणखी वाढली आहे. त्यामुळे नागरीकांनी पाण्याची बचत करण्याचे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात येत आहे.
मोरबे धरणातील पाणीसाठ्याची स्थिती……
सन २०२२-२३ सन २०२३-२४
१६ जूनपर्यंत पाऊस २८ मिमी १२.४० मिमी.
धरणातील पाणी पातळी ७०.८७ मी. ६९.१९मीटर
धरणातील पाणीसाठा ५८.०५४ दशलक्ष घनमीटर ४८.९६२ दशलक्ष घनमीटर
पाणीसाठा ३०.४१ टक्के २५. ६४ टक्के
नवी मुंबई महापालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरवे धरणात गेल्या वर्षीपेक्षा कमी पाणीसाठा आहे त्यामुळे २८एप्रिल पासून अगोदरच आठवड्यातून एक दिवस संध्याकाळी विभागवार पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येतो. जून महिन्याचे सोळा दिवसही धरण क्षेत्रात पाऊस झाला नाही. २० जूनपर्यंत पाऊस पडला नाही तर शहरात आठवड्यातून एक दिवसाऐवजी दोन दिवस विभागवार संध्याकाळचा पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. – संजय देसाई शहर अभियंता